इंदौर: मध्य प्रदेशात राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेला सामूहिक विवाह सोहळा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यातील वाद प्रचंड तापला आहे. आदिवासी बहुल झाबुआ जिल्ह्यात हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात झाबुआ येथील स्थानिक प्रशासनाने नवविवाहित जोडप्यांमध्ये कुटुंब नियोजनबद्दल जनजागृती व्हावी, यासाठी त्यांना एक खास भेट दिली होती. मात्र, लग्नाची हीच भेट आता वादाचे कारण ठरत आहे. यावरुन सध्या मध्य प्रदेशातील राजकारण तापले आहे. सरकारने नवविवाहित जोडप्यांना शरम वाटेल, अशी भेटवस्तू दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

सामूहिक विवाह सोहळ्यात नववधूंना मेकअप बॉक्स देण्यात आला होता. या मेकअप बॉक्समध्ये निरोध आणि गर्भनिरोधक गोळ्या ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. या मेकअप बॉक्सवर राष्ट्रीय हेल्थ मिशनचे स्टिकर्स लावण्यात आले होते. त्यावर फॅमिली प्लॅनिंगचा लोगो आणि ‘नयी पहल किट’ असा संदेशही लिहण्यात आला होता. या किटमधील गर्भनिरोधक गोळ्यांचा पुरवठा केंद्र सरकारकडून करण्यात आल्याचे समजते.

Condoms gifted in mass marriage

मध्य प्रदेश सामूहिक विवाह सोहळा

झाबुआ प्रशासनाकडून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेतंर्गत २९२ मुलींचे विवाह लावून देण्यात आले. या सामूहिक लग्नसोहळ्यानंतर जोडप्यांना मेकअप बॉक्स देण्यात आले होते. हे मेकअप बॉक्स उघडल्यानंतर त्यामध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या असल्याचे पाहून जोडप्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

या सगळ्या प्रकारासंदर्भात माहिती देताना झाबुआच्या जिल्हाधिकारी तन्वी हुडा यांनी सांगितले की, कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचे वाटप आरोग्य विभागाकडून करण्यात आले होते. कुटुंबनियोजनाविषयी जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. परंतु, कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या या मेकअप बॉक्समध्ये ठेवण्यात आलेल्या नव्हत्या. या दोन्ही गोष्ट स्वतंत्रपणे जोडप्यांना देण्यात आल्या होत्या. यासंदर्भात कोणत्याही जोडप्याने तक्रार केलेली नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here