नवी दिल्ली: कॅप्टन कुल धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने तब्बल पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. धोनीचे मैदानावर असणं संघाला अधिक बळ देणारं असतं, चाहत्यांच्या प्रेमाखातर धोनी पुढच्या सीझनमध्ये पुन्हा खेळेल असे तो म्हणाला आहे. पण तत्पूर्वी धोनीबद्दल एक मोठी माहिती समोर येत आहे. या संपूर्ण आयपीएल २०२३ च्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीदुखापतीमुळे त्रस्त दिसत होता. आता येत असलेल्या बातम्यांनुसार, गुडघ्याच्या दुखापतीमुळे एमएस धोनीला रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते. त्याच्यावर काही चाचण्या केल्या जातील, त्यासाठी त्याला कोकिलाबेन रुग्णालयात तपासासाठी जावे लागणार आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली, सीएसकेने सोमवारी खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव केला. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेचे हे पाचवे आयपीएल विजेतेपद आहे. यासह चेन्नई सुपर किंग्जने IPL मध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्सची बरोबरी केली आहे. अंतिम सामना जिंकल्यानंतर धोनी सेलिब्रेशन करत असतानाही धोनीच्या गुडघ्याला पट्टा होता.धोनीने चाहत्यांना वचन दिले आहे की तो पुढील वर्षीही आयपीएल खेळणार आहे, त्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागणार आहे. धोनीला आता त्याच्या फिटनेसवर खूप भर द्यावा लागणार आहे. धोनीला या आठवड्यात रुग्णालयात जावे लागणार आहे आणि गरज पडल्यास त्याला रुग्णालयात भरतीही केले जाऊ शकते. धोनीची दुखापत त्रासदायक Ravsportz ने आपल्या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की एमएस धोनीला या आठवड्याच्या अखेरीस कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मसिअल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये दाखल केले जाऊ शकते. एमएस धोनीला आयपीएल २०२३ दरम्यान गुडघ्याचा त्रास झाला होता, तो अनेक सामन्यांमध्ये देखील या दुखापतीमुळे त्रासात दिसला होता. आयपीएल २०२३ चा अंतिम सामना खेळायला आलेला धोनी बसमधून उतरत असतानाही खूप अडचणीत असल्याचे दिसून आले.धोनीच्या गुडघ्याबाबत काही चाचण्या होऊ शकतात, ज्यासाठी एमएस धोनी हॉस्पिटलमध्ये दाखल होऊ शकतो. ४१ वर्षीय धोनीने आयपीएल फायनल जिंकल्यानंतर सांगितले होते की, ‘माझ्यासाठी निवृत्ती घेणे सोपे आहे आणि पुढील १० महिने कठोर परिश्रम करून पुढील आयपीएल हंगाम खेळणे अधिक कठीण आहे. मला पुढील वर्षी आयपीएल खेळून माझ्या चाहत्यांना गिफ्ट द्यायचे आहे.’IPL 2023 च्या पहिल्या सामन्यापासून धोनी गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त दिसला पण त्याचा त्याच्या कर्णधारपदावर परिणाम झाला नाही. धोनी मैदानावरही खूप तंदुरुस्त दिसत होता आणि त्याने सामन्यांमध्ये स्वतःचे १०० टक्के योगदान दिले. धोनीने पुढच्या वर्षी खेळावे अशी चाहत्यांनाही इच्छा आहे, धोनीने याला दुजोरा दिल्याने सर्व चाहतेही खूश आहेत. त्यामुळे त्याचीही दुखापत साधारण असून लवकरात लवकर बॅरो होवो अशीच सर्वांची प्रार्थना असेल.