लखनऊ: वरात घेऊन जाण्यासाठी तयार होत असताना झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वऱ्हाडासोबत रवाना होण्यासाठी नवरदेव तयारी करत होता. तितक्यात त्याला हृदय विकाराचा झटका आला. नातेवाईकांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. नवरदेवाच्या निधनाबद्दल समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. कुटुंबीय, नातेवाईकांना जबर मानसिक धक्का बसला. उत्तर प्रदेशच्या बहराईचमध्ये ही घटना घडली. बहराईचमधील जरवल रोड परिसरात असलेल्या अटवा गावात हृदयद्रावक घटना घडली. राजकमल नावाचा तरुण वऱ्हाडासह क्योलीपुरवा अट्टैसा गावात जाणार होता. घरात लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. राजकमल तयारी करत होता. फेटा, मुंडावळ्या बांधल्या जात असताना त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला घाईघाईत मुस्तफाबाद सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हृदय विकाराच्या झटक्यानं त्याचा मृत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यानंतर लग्न घरात आक्रोश सुरू झाला. राजकमलच्या निधनाची माहिती वधू पक्षाला देण्यात आली. त्यांनी तातडीनं राजकमलचं घर गाठलं. वरातीत सहभागी होण्यासाठी राजकमलच्या घरी जमलेल्या नातेवाईक, ग्रामस्थांवर त्याच्याच अंत्ययात्रेत सहभागी होण्याची वेळ आली. लग्नासाठी नवरीच्या घरी जाण्यासाठी जमलेले सगळे जण स्मशानात गेले. शोकाकुल वातावरणात राजकमलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. लेकाच्या निधनामुळे वडील रामलाल यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. तरणाताठा लेक गेल्यानं ते कोलमडले आहेत. राजकमलच्या अकाली निधनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here