मयत संजय खंडू भंडारे हा मुळ बिलोली तालुक्यातील दुगाव येथील रहिवासी होते. लग्न झाल्यापासून तो उमरी तालुक्यातील हस्सा गावात सासरवाडीत राहत होता. प्रदीप आणि साईनाथ असे त्याला दोन मुले देखील आहेत. मोलमजुरी करून तो आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करायचा. मागील काही दिवसांपासून मयत आणि त्याच्या पत्नीत नेहमी वाद व्हायचे. पत्नीला तो नेहमी मारहाण देखील करायचा. अनेकवेळा मुलांसह सासरच्या मंडळीनी संजय भंडारे याला समजवण्याचा प्रयत्न देखील केला.
मात्र, संजय आपल्या पत्नीशी वाद घालून मानसिक त्रास द्यायचा. २८ मेच्या रात्रीही त्याने पत्नीसोबत वाद घालत मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हारागाच्या भरात प्रदीप भंडारे, साईनाथ भंडारे या दोन्ही मुलांसह सासरा नागोराव वाघमारे यांनी संजय भंडारे याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत संजय भंडारेचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घाबरून गेले. ही घटना कोणालही माहिती होऊ नये म्हणून आरोपींनी मध्यरात्री मृतदेह पोत्यात भरून शेताकडे नेला
पुरावा नष्ट करण्यासाठी कापसाच्या ढिगाखाली मृतदेह पुरून टाकला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी घटनास्थळी धाव घेतली आणि जेसीबीच्या मदतीने मृतदेह खड्ड्याबाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करुण घटनास्थळीच प्रेताची उत्तरीय तपासणी केली. या प्रकरणी उमरी पोलिसांनी प्रदीप भंडारे, साईनाथ भंडारे या दोन्ही मुलांसह सासरा नागोराव वाघमारे या तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, मुलांनीच जन्मदात्या पित्याची हत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.