टीनएज म्हणजे १२ ते १७ वर्षे वय हा माणसाच्या आयुष्यातील असा काळ असतो, जेव्हा त्यांना तेवढी समज नसते, पण ते स्वतःच्या हिशोबाने जगाकडे बघू लागतात, विचार करू लागतात. या प्रक्रियेत अनेकवेळा किशोरवयीन मुलं असे चुकीचे निर्णय घेतात, ज्याचे नुकसान केवळ मुलांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाही भोगावे लागते. असाच काहीसा प्रकार चीनमधील एका मुलीसोबत घडला. जिने एकतर्फी प्रेमप्रकरणात आपला जीव गमावला.
कुपोषणामुळे मुलीचा मृत्यू
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, १५ वर्षांच्या एका मुलीची ही कहाणी आहे जी शाळेत शिकत होती. ही मुलगी ग्वांगडोंग प्रांतातील डोंगगुआन शहरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तिची लांबी १६५ सेमी होती आणि मृत्यूच्या वेळी तिचे वजन २५ किलो होते. मुलगी तिच्या मृत्यूपूर्वी २० दिवस कोमात होती. कारण तिला एनोरेक्सिया नर्वोसा म्हणजेच कुपोषणाचा एक भयानक आजार झाला होता. या मुलीचे फोटो आणि कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुलाला प्रभावित करायचे होते
या मुलीचं एका मुलावर एकतर्फी प्रेम होतं. तिला त्याचं मन जिंकायचं होतं. पण, हा मुलगा दुसऱ्या कुठल्या मुलीच्या प्रेमात होता जी तिच्यापेक्षा बारीक होती. त्यामुळे तिनेही आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरु केला. जेव्हा मुलीचं वजन खूप कमी झालं तेव्हा तिच्या आई-वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. तीव्र कुपोषणामुळे तिच्या अवयवांनी काम करणे बंद केले होतं आणि २० दिवस कोमात राहिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितले की ती कापसाच्या रजईसारखी हलकी होती कारण तिचे वजन फक्त २५ किलो राहिले होते.