वृत्तसंस्था, सँटा क्लारा : ‘भारतात असे लोक आहेत ज्यांना वाटते की, त्यांना देवापेक्षा जास्त माहीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याचे एक उदाहरण आहे,’ अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांची एकजूट झाल्यास भाजपला पराभूत करता येईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. काही खलिस्तान समर्थकांनी राहुल गांधी यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले.‘आपल्याला सगळ्यातील सगळे कळते, असा या मंडळींचा समज आहे. त्यामुळे ते इतिहासतज्ज्ञाला इतिहास समजावून सांगू शकतात, शास्त्रज्ञाला विज्ञान आणि सैन्याला युद्धशास्त्राबाबत माहिती सांगू शकतात’, असे राहुल यांनी नमूद केले. ‘हे जग खूप मोठे आणि गुंतागुंतीचे असल्यामुळे कोणत्याही व्यक्तीला सर्व काही माहीत असणे अशक्य आहे. मात्र, भारतात एक गट असा आहे, त्यांना आपल्याला सगळ्यातील सर्व काही माहीत आहे, अशी खात्री वाटते. हा एक आजारच आहे. त्यांना वाटते की, ते देवापेक्षाही जास्त जाणतात. ते देवाबरोबर बसून काय चालले आहे, हे देवाला समजावून सांगू शकतात. अर्थातच, पंतप्रधान मोदी याचे एक उदाहरण आहेत. तुम्ही मोदींना देवाबराबेर बसवले, तर ते त्यालाही विश्व कसे चालते, हे समजावून सांगतील. देव स्वत:च्याच निर्मितीबाबत संभ्रमात पडेल’, असेही राहुल गांधी म्हणाले.

‘भारताच्या मूळ संकल्पनेवर (आयडिया ऑफ इंडिया) सध्या हल्ला होत आहे आणि त्याला आव्हान दिले जात आहे. मोदी आणि त्यांचे सरकार बेरोजगारी, महागाई, राग आणि द्वेष पसरवणे यांसारख्या समस्या सोडवू शकत नाहीत. नवीन संसदेची इमारत ही या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचाच एक भाग आहे. भाजप या मुद्द्यांवर खरोखर चर्चा करू शकत नाही, त्यामुळे त्यांना ‘सेंगोल’सारख्या गोष्टी आणाव्या लागतात’, असे त्यांनी नमूद केले.

‘आज भारतात गरीब आणि अल्पसंख्याक समाजाला असहाय्य वाटत आहे. भारतीय नागरिकांचा परस्पर द्वेषावर विश्वास नाही. व्यवस्था आणि माध्यमांवर नियंत्रण ठेवणाऱ्या लोकांचा एक छोटा गट द्वेषाची आग भडकवत आहे. महिला आरक्षण विधेयकावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही विधेयक मंजूर करून घेण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्हाला राजकीय व्यवस्थेत, व्यवसायात आणि देश चालवताना महिलांना त्यांचे योग्य स्थान द्यायचे आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.
टाइम्सची एक बातमी अन् इंडियन स्नेक्सची साथ… हेरगिरीची अशी कहाणी तुम्ही कधीही ऐकली नसेल
भाजपला पराभूत करणे शक्य

‘नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या जोरदार विजय झाला. त्यामुळे विरोधी पक्ष विचारपूर्वक एकत्रित आले, तर हे साध्य होऊ शकते. त्या दिशेने काँग्रेस काम करत आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही योग्य दिशेने दिसत आहे. विरोधक एकत्र आले, तर सत्ताधारी भाजपचा पराभव होऊ शकतो’, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here