म. टा. वृत्तसेवा, सिडको : एका खासगी फायनान्स कंपनीच्या थकीत कर्जाच्या हप्ता वसुलीसाठी गेलेल्या वसुली कर्मचाऱ्यावर थकबाकीदाराकडून अ‍ॅसिड फेकण्यात आल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या प्रवेशद्वारावर घडली. वसुली कर्मचाऱ्याबरोबर आलेला त्याचा मोठा भाऊही यात ३० ते ४० टक्के भाजला आहे.काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश बाबुराव फापाळे (३१, रा. विडी कामगारनगर, अमृतधाम) हे बजाज फायनान्स कंपनीच्या वसुलीचे काम करतात. सुनील देशमुख (रा. दातीर मळा) यांच्याकडे कंपनीची थकबाकी होती. त्यापोटीचा हप्ता घेण्यासाठी फापाळे हे देशमुख यांना दोन ते तीन दिवसांपासून फोन करीत होते. त्यामुळे थकबाकीदार देशमुख याने फापाळे यांना पैसे घेण्यासाठी कंपनीत बोलावले. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास फापाळे व त्यांचा चुलतभाऊ किरण फापाळे हे दोघे नाशिक वेल्डिंग प्रॉडक्ट्स ट्रॉली, अंबड या कंपनीच्या पार्किंगमध्ये देशमुखला भेटले. यावर थकलेले पैसे मी देणार नाही, असे म्हणून देशमुख याने फापाळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर देशमुख याने हातात असलेल्या प्लास्टिकच्या बाटलीमधील अॅसिड फापाळे बंधूंवर टाकले. यात दोघांच्याही शरीरावरील कपडे पूर्णतः जळाले. जीव वाचविण्यासाठी फापाळे बंधू तसेच पाथर्डी फाटा येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झाले. या हल्ल्यात गणेश फापाळे तब्बल ४० टक्के भाजले असून, त्यांचा चुलतभाऊ किरण हेदेखील ३० ते ३५ टक्के भाजले आहेत. दोघांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संशयित सुनील देशमुख यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात कलम २२६ ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीची सुरक्षितता वाऱ्यावर

अंबड औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने कंपनीतूनच अॅसिडची बाटली भरून आणत त्यातील अॅसिड वसुली कर्मचाऱ्यांच्या तोंडावर फेकले. हे अॅसिड ने-आण करताना संबंधित कंपनीचे सुरक्षारक्षक काय करत होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कंपनीची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे यामुळे समोर आले आहे.
आराम करायला आलेल्या ‘आजारी’ मेहुण्यामुळे नसता ‘ताप’; बहीण, भावोजी घराबाहेर जाताच साधला डाव!
वसुली कर्मचाऱ्यांची दमदाटी

शहरात अनेक फायनान्स कंपन्या असून, त्यांच्याकडून त्या जास्त व्याजदराने नागरिकांना कर्ज देतात. कर्जदारांकडून पैसे देण्यास विलंब झाल्याने वसुली कर्मचारी थेट घरापर्यंत येऊन दमदाटी व शिवीगाळ करण्याचे प्रकार करतात. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यासाठी पोलिस प्रशासनाने या दमदाटी करणाऱ्या वसुली कर्मचाऱ्यांविरोधात कठोर पावणे उचलणे गरजेचे आहे, असल्याचेही मत व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here