म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत समृद्धी महामार्गावरील वैजापूर येथे ‘अॅग्रो लॉजिस्टिक पार्क’ उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शेतीमाल साठवणुकीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या ‘लॉजिस्टिक पार्क’ची मदत होणार असून, हे पार्क विकसित करण्यासाठी ३०.६२ कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. राज्य वखार महामंडळामार्फत या लॉजिस्टिक पार्कची उभारणी केली जाणार असून, या ठिकाणी सहा हजार टन साठवणूक क्षमतेची दोन गोदामे, दहा हजार टन क्षमतेचे सायलो, १,४०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे सामायिक सुविधा केंद्र; तसेच क्लीनिंग व ग्रेडिंग यार्ड उभारण्यात करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय बुधवारी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जाहीर केला आहे.राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्यात अॅग्रो लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. या संदर्भात राज्य सरकारच्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीने २९व्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता दिली होती. मात्र या प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याला अखेर मान्यता मिळाल्याने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठी ३०.६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील ७.६८ कोटी रुपयांचा स्वनिधी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत केला जाणार आहे. उर्वरित २२.९४ कोटी रुपयांचा निधी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून उभा केला जाणार आहे.
मोठी बातमी: नवी मुंबईत उभं राहणार प्रति तिरुपती बालाजी, भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला
असा आहे शासन निर्णय…

– महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करणार आहे.
– या प्रकल्पाचे काम सुरू करताना त्याचे संनियंत्रण आणि मूल्यमापन करण्यासाठी सहकार आणि पणन विभागाशी संपर्क साधला जाणार आहे.
– प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत आर्थिक व भौतिक प्रगती अहवाल सहकार विभागाला सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
– वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी समिती स्थापन करून प्रकल्पांच्या आर्थिक व भौतिक उद्दिष्टांचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here