मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत राजेंद्र खांबे(वय १४) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. वेदांत खेर्डी शिवाजीनगर परिसरात राहत होता. २९ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास वेदांत खेर्डी एम.आय.डी.सी. येथील वाशिष्ठी नदीच्या पात्रात गणपती विसर्जन घाट बांधण्यात आला आहे, त्या ठिकाणी पोहण्यासाठी गेला होता. त्याला पोहता येत नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाशिष्ठी नदी पात्रामध्ये वाहून गेला होता. तेव्हापासून वेदांतचा शोध घेतला जात होता.
पोहता न येणारा वेदांत पोहण्यासाठी गेल्याने घरच्यांसह अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. दोन दिवसांनतर त्याचा मृतदेह नदी परिसरातील नलावडे बंदर शंकरवाडी येथे मिळाला. कामथे येथील रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर वेदांतचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
खेर्डी सती हायस्कूल मध्ये इयत्ता नववीत शिकत असलेल्या वेदांत खांबे याच्या अकाली मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता मात्र, त्याच्या अशा जाण्याने घरच्यांनाही मोठा धक्का बसला आहे. या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News