श्रीरामपूर येथील डॉ. चंदन लोखंडे समाजकार्यातही अग्रेसर आहेत. करोना काळात त्यांनी धोका पत्कारून रुग्णसेवा केली आहे. त्या आधीपासून ते समाजिक कार्यात आहेत. समाज जागरुक व्हावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वाचनायही सुरू केले. त्यांनी २०१३ साली वैदू जातपंचायतीचा खरा चेहरा, त्यातील स्वयंघोषित न्यायाधीश व पंच प्रमुख यांचे एक कारस्थान पुराव्यासह उघडकीस आणले होते. त्यानंतर २०१८ मध्ये जात पंचायतीच्या निर्णयाने पीडित एका कुटुंबाची बाजू घेऊन त्यांना मदत केली होती. त्यानंतर डॉ. लोखंडे यांना समाजानेच नव्हे तर नातेवाईकांनीही दूर ठेवण्यास सुरवात केली. जातपंचायतीच्या भीतीमुळे नातेवाईक त्यांना कार्यक्रमांना बोलावित नाहीत. जातपंचातीतील काही लोकांनी त्यांच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल केले.
समाजाकडून त्रास होत असताना जवळचे नातेवाईकही दूर जात असल्याचा अनुभव आता त्यांना येत आहे. दोन दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील त्यांच्या बहिणीच्या मुलाचा विवाह झाला. भाच्याच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका येईल, या आशेवर असलेल्या मामाच्या हाती बहिणीचे पत्र पडले. त्यात निमंत्रण नव्हे तर लग्नाला येऊ नये, अशी विनंती करण्यात आलेली होती.
डॉ. लोखंडे यांच्या बहिणीने पत्रात म्हटले आहे की, दादा, माझ्या मुलाच्या हस्ते आपणास पत्र लिहिताना अतिशय दुःख होत आहे. माझ्या दुसऱ्या मुलाचा विवाह ३० मे रोजी होणार आहे. तरी कृपया आपणास हात जोडून विनंती करते की, तुम्ही कोणीही माझ्या मुलाच्या लग्नाला येऊ नका. कारण तुम्हाला व तुमच्या भावबंधांना गेल्या पाच सहा महिन्यापासून जातीतून बहिष्कृत केलेले आहे. म्हणूनच आमच्या गावातील पंचानी मला व तुमच्या दाजींना ठणकावून आदेश दिला की “तुमचे बंधू मामा म्हणून नवरदेवच्या मागे थांबणे अशुभ आहे, म्हणून ते चालणार नाही. एकतर तुमच्या माहेरचे सर्वजण गेल्या पाच-सहा महिन्यापासून जातीबाहेर आहेत. दुसरे म्हणजे त्यांनी तुमच्या स्वर्गीय आईचा तेरावा केला नाही. म्हणून तुम्ही तुमच्या माहेरचे कोणालाच लग्नाचे आमंत्रण देऊ नये. जर का चुकूनही तुझ्या माहेरचे कुणीही मंडपात दिसल्यास लग्न तर होऊ देणार नाहीच आणि १२ लाख रुपये दंड तुमच्याकडून वसूल केला जाईल, असा ठराव झाला आहे. तरी कृपया तुम्ही माझ्या मुलाच्या लग्नाला येऊ नये, असे या पत्रात म्हटले आहे.