यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की, पंकजा मुंडे या भाजपमध्ये आहेत, पण त्यांना भाजप आपलं मानत नाही. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजप उभा करण्यासाठी रक्ताचं पाणी केले. त्या मुंडे परिवाराचं अस्तित्त्व राजकारणात राहू नये, यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरु आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे राजकारणात असणाऱ्या मुंडे परिवाराच्या प्रमुख लोकांनी साहसाने निर्णय घेणे गरजेचे आहे. राजकारणात हिंमतीने निर्णय घेण्याची गरज असते. परिणामांची पर्वा न करता निर्णय घेतले तरच राजकारणात टिकता येते. माझ्यावर अन्याय होतोय, अशा नेहमीच्या रडगाण्याला कोणी विचारत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. पंकजा मुंडे यांचा गेल्या निवडणुकीत पराभव का व कसा झाला?, हे सांगण्याची आता गरज नाही. भाजप परिवारातच आता मुंडे परिवाराविरोधात राजकारण सुरू आहे. काहीही असले तरी आमची मुंडे परिवाराविषयी आस्था कायम राहील, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
पंकजा मुंडे यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
पंकजा मुंडे यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात खळबळ उडवून देणारी वक्तव्यं केली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित होते. यावेळी पंकजा यांनी म्हटले की, तुम्ही म्हणताय ताईची पार्टी ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण तो मोठा पक्ष आहे. मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल. महादेव जानकर जातील मेंढ्या वळायला. अजून काय आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.