अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये फेसबुकच्या वापरकर्त्यांना थेट संदेश (डीएम) येतो. त्यामध्ये ‘तुमच्या ओळखीच्या कोणाचे नुकतेच निधन झाले आहे आहे,’ असा उल्लेख करून तपशीलासाठी ‘लिंक’वर ‘क्लिक’ करण्यास सांगितले जाते. संबंधित तपशील पाहण्यासाठी फेसबुक यूजरनेम आणि पासवर्ड टाकण्यास सांगितला जातो. मात्र, तसे केल्यास वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरीला जाते; तसेच पैशांनाही गंडा घातला जातो, असे आढळून आले आहे. त्याबरोबरच हे हॅकर या खात्याचा ताबा घेतात आणि त्यांच्याकडून संबंधित वापरकर्त्याच्या फ्रेंडलिस्टमधील इतरांना त्याच्या नावाने तसाच संदेश पाठविला जातो. फेसबुक खात्यातील अन्य माहितीचा (जन्मतारीख, इमेल ॲड्रेस, दूरध्वनी क्रमांक) वापर करून वापरकर्त्याच्या अन्य समाजमाध्यमांच्या खात्यांमधील माहितीही चोरण्यात येत आहे. अनेकदा अशा खात्यांमध्ये बँक खात्यांचे किंवा अन्य आर्थिक तपशील असल्याने पैसे चोरीला जाण्याचा धोका असतो.
अशा प्रकारच्या कोणत्याही संशयास्पद लिंक वर क्लिक करू नये, शंका आल्यास संबंधित संदेश पाठविणाऱ्या व्यक्तींशी थेट दूरध्वनीवर संपर्क साधून खातरजमा करून घ्यावी,असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
फसवणुकीच्या या प्रकारातून गेल्या पाच महिन्यांत ऑस्ट्रेलियातील वापरकर्त्यांनी सुमारे सव्वा कोटी डॉलर गमावल्याची माहिती ऑस्ट्रेलियन कॉम्पिटिशन अँड कन्झ्युमर कमिशनकडून देण्यात आली आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये अशाच मेटा कंपनीच्या कोणा ना कोणा प्लॅटफॉर्मद्वारे दर सात मिनिटांत एक वापरकर्ता ऑनलाइन शॉपिंग घोटाळ्यांना बळी पडत असल्याचा अहवाल आला आहे. त्यातून दर आठवड्यास सुमारे पाच लाख पौंडांचा फटका ग्राहकांना बसत असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. तेथील लॉइड्स बँकिंग ग्रुपच्या अंदाजानुसार या ऑनलाइन शॉपिंग घोटाळ्यांपैकी सुमारे ७० टक्के प्रकार हे फेसबुक किंवा इन्स्टाग्रामशी संबंधित आहेत.