नवी दिल्ली: उत्तर दिल्लीतील सिव्हिल लाईन्स परिसरात असलेल्या मजनू का टिला येथे दारुच्या नशेत एका महिलेनं तिच्या मैत्रिणीची हत्या केली. राणी (३५) असं मृत महिलेचं नाव असून तिच्या हत्येप्रकरणी सपनाला अटक करण्यात आली आहे. सपनानं पोलिसांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले. मात्र सतत जबाब बदलल्यानं ती संशयाच्या भोवऱ्यात अडकली. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच तिनं गुन्ह्याची कबुली दिली.सोमवारी रात्री झालेल्या पार्टीत राणीनं आपल्या दिवंगत वडिलांना शिवीगाळ केली. त्यावरुन दोघींमध्ये वाद झाला, अशी माहिती सपनानं पोलिसांना दिली. दोघींमधील वाद वाढत गेला आणि सपनानं राणीच्या छातीत चाकू भोसकला. चाकूनं अनेक वार करत तिनं राणीची हत्या केली. राणीच्या मृतदेहाजवळ सपना बराच वेळ बसून होती. दीड तासानंतर तिनं पीसीआरला कॉल केला.
मुंबईकर तरुणानं महिलेला संपवलं, मांस खाल्लं; आता भयंकर सत्य समोर; जगातलं पहिलंच प्रकरण
हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी सपनाला अटक केली. हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुन्हे शाखेसोबतच फॉरेन्सिक विभागानंदेखील घटनास्थळाची पाहणी करुन पुरावे गोळा केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळची पश्चिम बंगालची असलेली राणी तिची मैत्रीण सपनासोबत मजनू का टिला परिसरातील अरुणा नगरात राहायची. तिच्या आई, वडिलांचा मृत्यू झाला आहे. गुरुग्राममधील एका ब्युटी पार्लरमध्ये ती नोकरी करायची. तर सपनाचा घटस्फोट १५ वर्षांपूर्वी झाला आहे. तिला एक मुलगी असून ती सपनाच्या पतीसोबत राहते.

सपना राणीसोबत एकाच खोलीत राहायची. दिल्लीत ती वेटर म्हणून काम करायची. सोमवारी रात्री सपना आणि राणीची मैत्रीण असलेल्या नेहानं डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. यात आणखी काही जण सहभागी झाले होते. पार्टीत दारु पिताना राणी आणि सपनामध्ये वाद झाला. उपस्थितांनी त्यांच्यातला वाद मिटवला. घरी परतल्यानंतर राणी आणि सपना साडे चारपर्यंत दारु पित होत्या. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा भांडण झालं. सपनानं स्वयंपाकघरातील मोठा चाकू आणून राणीच्या छातीवर अनेक वार केले. राणीचा मृत्यू झाल्यानंतर सपना तिच्या शेजारीच बसून होती.
भयंकर! ग्रामस्थांनी महिलेची साडी खेचली, गावभर फिरवलं; पतीचा गावकऱ्यांसोबत डान्स
सकाळी सात वाजता सपनानं पीसीआरला कॉल केला. माझ्या मैत्रिणीची कोणीतरी हत्या केली आहे, अशी माहिती तिनं पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सपनाकडे विचारणा केली. आपण घराच्या छतावर असताना कोणीतरी राणीची हत्या केल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. चौकशीदरम्यान तिनं अनेकदा तिचा जबाब बदलला.

यानंतर पोलिसांनी रात्रीच्या पार्टीबद्दल प्रश्न केले. नेहाला बोलावून तिची चौकशी करण्यात आली. पार्टीत दोघींचा वाद झाल्याचं तिनं सांगितलं. पहाटेच्या सुमारास सपनानं व्हिडीओ कॉल करुन कोणीतरी राणीची हत्या केल्याची माहिती दिली होती, असंही नेहानं पोलिसांना सांगितलं. हत्या पहाटे झाली, मग आम्हाला इतक्या उशिरा माहिती का दिली, असा प्रश्न पोलिसांनी सपनाला विचारला. या प्रश्नानं सपना भांबावली आणि तिनं हत्येची कबुली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here