सुनील दिवाण, पंढरपूरः लॉक डाऊनला पाच महिने उलटल्यानंतर अनेक निर्बंध शिथिल होत असताना राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी जोरदारपणे पुढे येऊ लागली आहे. यातच विश्व वारकरी सेनेने मंदिरात घुसण्याचा इशारा दिला आहे. २६ ऑगस्टपर्यंत निर्णय न दिल्यास १ लाख वारकरी राज्यभरातून मंदिरात घुसतील, असा इशारा विश्व वारकरी सेनेने दिला आहे. परिस्थितीचे गांभीर्य वाढू लागले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही आता विश्व वारकरी सेनेच्या सुरत सूर मिसळत मंदिरे उघडण्याबाबत ट्विट करीत पाठिंबा दर्शवला आहे. अशावेळी मंदिरे उघडणे खरंच शक्य आहे का? असा सवाल नागरिकांच्या मनात येऊ लागला असताना मंदिरे उघडण्यात अडचणीच जास्त असल्याचं दिसत आहे.

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर १७ मार्चपासून बंद करण्यात आले होते. या पाच महिन्याच्या काळात चैत्र व आषाढी या दोन मोठ्या यात्रा भाविकांच्याविना करण्यात आल्या. मात्र आता जर परवानगी दिल्यास राज्यभरातून दर्शनासाठी येणारे हजारो भाविकांना रोखून करोनाचे नियम पाळत सोशल अंतर राखत दर्शन व्यवस्था सुरू करणं अवघड बनणार आहे. यातच विठुरायाच्या पायावर दर्शन असल्याने लक्षणे न दिसणारा एखादा करोनाचा रुग्ण पायावर दर्शन घेऊन गेल्यास त्यानंतर दर्शन घेणाऱ्या भाविकांना करोना संसर्गाचा धोका आहे. याचसोबत दर्शन रांगेत उभ्या असणाऱ्या हजारो भाविकांमध्ये काही करोनाग्रस्त भाविक असल्यास त्यामुळेही पुन्हा कोरोना वाढण्यास मदत होईल, असं मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी सांगितलं. अशाही परिस्थितीत राज्य सरकारने मंदिरे उघडण्याचे आदेश दिल्यास सर्व नियम मर्यादित भाविकांना दर्शन देण्याचा प्रयत्न प्रशासन करेल, अशी भूमिका मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी व्यक्त मांडली. मंदिर सुरू करण्याबाबत वारकरी संप्रदाय आग्रही असून मंदिर परिसरातील व्यापारी देखील मंदिर सुरू होण्याची वाट पाहत आहेत. आता या सर्व परिस्थितीनंतर सरकार काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here