तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्च रोजी त्या व्यक्तीला एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आला. या व्हिडीओ कॉल वर एक महिला बोलत होती. बोलताना तिने अचानक आपल्या अंगावरील कपडे काढण्यास सुरुवात केली यानंतर लगेच या व्यक्तीने कॉल कट केला.
काही वेळांनंतर त्या महिलेने या व्यक्तीला एक व्हिडिओ आणि काही स्क्रीनशॉट्स पाठवले ज्यात व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग होते. यानंतर त्या व्यक्तीला दुसऱ्या अनोळखी नंबरवरून कॉल आला या वेळी कॉल वर एक पुरुष बोलत होता. त्याने स्वतःची ओळख दिल्लीचा पोलीस आयुक्त अशी सांगितली.
फोनवर बोलणाऱ्या आयुक्ताने सांगितले की, ती महिला सेक्स रॅकेट चालवते. तसेच, तिच्याबद्दल चौकशी करत असताना आम्हाला तुमचा व्हिडिओ मिळाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात येणार होता असे सांगत त्या पोलीस आयुक्ताने जर व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होऊ द्यायचा नसेल तर मी दुसरा नंबर देतो यावर फोन करा असे सांगितले. त्यानुसार या व्यक्तीने फोन केला असता त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
पीडित व्यक्तीने बदनामीच्या भीतीने ५० हजार रुपये त्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर ट्रान्सफर केले. मात्र, त्यानंतरही या व्यक्तीकडे पैशांची मागणी होत राहिली. दरम्यान, १८ मार्च ते २५ मार्च या कालावधीत या व्यक्तीकडून तब्बल सहा लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले. यानंतर या व्यक्तीने पोलिसात धाव घेत सेक्सटॉर्शनच्या विरोधात तक्रारीची नोंद केली आहे.