अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काल जामखेड तालुक्यातील चौंडी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यानगर नाव देणार असल्याची घोषणा केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला एका मागणीची आठवण करून दिली आहे. कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी मंजूर करण्यात आली आहे, मात्र त्याची अधिसूचना अद्याप काढण्यात आली नाही. अहिल्यादेवींच्या जयंतीच्या दिवशी ती काढावी, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा आमदार पवार यांनी दिला होता. आता जयंती होऊन गेल्यानंतर पवार यांनी पुन्हा एकदा सरकारला याची आठवण करून देत उपोषणावर ठाम असल्याचे कळविले आहे.

आमदार पवार यांनी यांसबंधी म्हटले आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी माझ्या मतदारसंघातील एमआडीसी अधिसूचना काढण्याची मागणी सरकारकडे केली होती. पण ही तारीख उलटून गेली तरी सरकारने अधिसूचना काढली नाही. आता राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत (२६ जून) वाट पाहू आणि तरीही अधिसूचना काढली नाही तर आधी जाहीर केल्याप्रमाणे युवा आणि नागरिकांसह मंत्रालयात उपोषण करून जनतेची ताकद दाखवून देऊ, असा इशारच पवार यांनी दिला आहे.

कार्यक्रमावर छाप, नाव घेताच टाळ्या अन् शिट्ट्या, मुख्यमंत्र्यांची शाबासकी, पडळकर ‘अहिल्यानगर’चे हिरो!

आमदार पवार यांच्या पाठपुराव्यामुळे एमआयडीसीसाठी कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्याला मध्यवर्ती ठरणारी कर्जत तालुक्यातील पाटेगाव व खंडाळा येथील जागेची निवड करण्यात आली. पाटेगाव व खंडाळा येथील क्षेत्राची सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भू-निवड समितीने १८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहणी केली. त्यानंतर या क्षेत्राचे ड्रोन सर्वेक्षण जानेवारी २०२२ मध्ये करण्यात आले. १४ जुलै २०२२ रोजी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत पाटेगाव व खंडाळा तालुका कर्जत येथील ४५८.७२ हेक्टर क्षेत्राला तत्वत: मान्यता देण्यात आली.

मात्र, पुढे याची अधिसूचना निघाली नाही. त्यासाठी आमदार पवार यांनी हिवाळी अधिवेशनात २३ डिसेंबर २०२२ रोजी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे याकडे लक्ष वेधले. लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने उद्योग मंत्र्यांनी याला तत्वतः मान्यता देण्यात आल्याची बाब मान्य केली होती. त्यानंतरही पवार यांनी यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विट करून सरकारला इशारा दिला होता. त्यांनी म्हटले होते. “वारंवार स्मरणपत्र देऊनही राजकीय द्वेषामुळे माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना सरकार काढत नाही. त्यामुळे स्मरणशक्ती वाढावी म्हणून सरकारला च्यवनप्राश देण्याची आणि प्रसंगी माझ्या मतदारसंघातील युवा आणि नागरिकांसाठी उपोषण करण्याचीही माझी तयारी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी अधिसूचना निघावी आणि राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत प्रत्यक्ष कार्यवाही सुरू व्हावी, अशी मागणी पवार यांनी केली होती. त्यातील पहिली मुदत संपून गेल्यानंतर आता पवार यांनी पुन्हा आठवण करून दिली आहे.

रोषणाईचा झगमगाट अन् आरत्या; अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त रोहित पवारांकडून महापूजा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here