साधारण एक वर्षापूर्वी गायत्रीचा विवाह कल्याणमध्येच राहणाऱ्या चंदन परमार याच्यासोबत झाला होता. लग्नाच्या महिनाभरानंतर चंदन हा किरकोळ कारणावरुन गायत्रीशी वाद घालू लागला, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर तिला मारहाण करू लागला. गायत्रीने याबाबत बाजरपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. या पीडित महिलेने त्यानंतर खडकपाडा येथील महिला तक्रार निवारण कक्षात देखील अर्ज केला होता.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यापासून गायत्री ही आपल्या माहेरी बिर्ला शाळेजवळ, कल्याण येथे राहात होती. महिला निवारण कक्षात दोन वेळा चर्चा झाली. शेवटच्या मिटींगवेळी गायत्रीने आपण चंदन परमार याच्यासोबत नांदत नसल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे गुन्हा ही दाखल करणार असल्याच ती म्हणाली होती.
निवारण कक्षातील बैठकीनंतर सर्व जण खाली आले. त्यावेळी परमार कुटुंबाने गायत्री आणि तिच्या आई वडिलांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. गायत्रीने ही बाब पोलिसांना सांगितली. पण पोलिसांनी योग्य ते सहकार्य केले नाही, उलट “अर्धा तास थांबा, त्यांना आधी जाऊ द्या, मग तुम्ही जा”, असा सल्ला दिला. त्यानुसार गायत्री आणि तिचे आई वडील अर्धा तासाने बाहेर पडले.
मात्र, बारावे गाव रिक्षा स्टॅण्ड, पटेल मार्टजवळ परमार कुटुंबीयांनी गायत्री आणि तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. चंदनच्या भावाने गायत्रीला दगड मारल्यामुळे तिला दुखापत झाली. जर पोलिसांनी आधीच तक्रार घेतली असती तर हे सर्व घडलं नसतं, असं गायत्रीच म्हणणं आहे. पती चंदन विनोद परमार, सासरे विनोद विरा परमार, सासु हेमा विनोद परमार, दिर दिपेश विनोद परमार आणि अन्य दोघांविरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.