निऱ्हाळे फत्तेपूर येथील भूमिपुत्र व सध्या नवी मुंबई येथे वास्तव्यास असलेले शिवराम फकीरबा सांगळे (६२) हे अधिक्षक शिक्षण निरीक्षक विभाग, मुंबई या ठिकाणाहून चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. काही दिवसांपासून ते अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त होते. बुधवारी सकाळी ७.३० वाजता त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी गावाकडे करण्याचे ठरविल्यानंतर त्यांचे पार्थिव घेऊन नातेवाईक मुंबईहून गावाकडे निघाले.
मुलाच्या निधनाची वार्ता ९५ वर्षीय आई ठकूबाईला कळविली गेली नव्हती. परंतु अंत्यविधीसाठी नातेवाईक घरी येण्यास सुरुवात झाल्यानंतर मुलाच्या निधनाची बातमी आई ठकूबाईला कळली आणि त्यांना पुत्रवियोगाचा धक्का सहन न झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचेही निधन झाले. त्यामुळे सांगळे कुटुंबीयांवर दुःखाचा दुहेरी डोंगर कोसळला आहे. निऱ्हाळे स्मशानभूमीत मुलगा शिवराम यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच आईच्याही अंत्यविधीची वेळ नातेवाईकांवर आली आहे.
जाम नदीवरील स्मशानभूमीत आई व मुलाला एकाच वेळी अग्निडाग देण्यात आला. शिवराम यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, भाऊ, भावजय, नातवंडे, पुतणे व सुना असा मोठा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी शिवराम यांचे धाकटे बंधू प्रदीप यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आता आई आणि मुलाचे एकच दिवशी निधन झाल्याने सांगळे कुटुंबावर पुन्हा दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.