मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, उरण आणि कर्जत या सहापैकी पाच मतदारसंघाच्या ‘बुरजां’वर श्रीरंग बारणेंनी २०१९ ला मताधिक्य मिळविले. तर केवळ कर्जत या एकमेव मतदारसंघावर प्रभाव ठेवण्यास राष्ट्रवादी यशस्वी झालं. मात्र बारणेंनी आता शिंदे गटात प्रवेश केल्याने मावळ लोकसभेची जागा २०२४ ला आघाडीत राष्ट्रवादीकडे घेण्याची मागणी पिंपरी-चिंचवडसह मावळातील पदाधिकाऱ्यांनी केलीये. या जागेवर राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या माजी मंत्री आदिती तटकरे यांना राष्ट्रवादीकडून संधी मिळण्याच्या चर्चा राष्ट्रवादीत सुरु आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघाची गणित काय?
- मावळ हा संमिश्र लोकवस्तीचा मतदारसंघ
- एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने चिंचवड मतदारसंघातील सर्वच भागांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं
- मात्र २०१४ मधील लोकसभा निवडणुकीपासून उतरती कळा लागली
- बारणेंनी राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावला आणि विधानसभेसह महापालिका निवडणुकीत गड खचला
- २०१९ ला पार्थ पवारांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीतील सर्व गटतट एकत्र झाले
- पण बारणेंकडून पार्थ पवारांचा जवळपास सव्वा लाखाने फरकाने पराभव झाला
मावळ मतदारसंघातील कर्जत, उरण, पनवेल या विधानसभा मतदारसंघात तटकरे कुटुंबीय चांगली ताकद बाळगून आहेत. शेजारच्याच रायगडमधून सुनील तटकरे खासदार आहेत. आदिती यांनीही मंत्री आणि आमदार म्हणून काम करताना रायगड जिल्ह्यात आपली फळी उभी केली आहे. त्यामुळे २०२४ साठी मावळ मतदारसंघासाठी आदिती तटकरेंच्या नावाची चर्चा आहे.
- ‘मविआ’ म्हणून राष्ट्रवादीसोबत यावेळेस ठाकरेंची शिवसेना आहे
- ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग असल्याने मतदारसंघांमध्ये उलटफेर होण्याची शक्यता
- त्यामुळे बारणेंसाठी २०२४ ची लोकसभा निवडणूक मोठं आव्हान ठरण्याची शक्यता
- राष्ट्रवादीला इथून ठाकरे गटाची साथ मिळणार हे गृहीत धरले
- तरी पार्थ पवार यांच्याऐवजी आदिती तटकरे यांच्यासाठी प्राधान्याने विचार होणार
- पार्थ पवारांकडे स्वतःची ताकद नाही, २०१९ नंतर ते मतदारसंघांमध्ये सक्रिय नाहीत
त्यामुळेच आदिती तटकरेंच्या नावावर एकमत होईल आणि त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल, असं बोललं जातंय. मात्र दुसरीकडे मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके यांच्याही नावाची अधून-मधून चर्चा होत असते. मात्र, त्यांना विधानसभेतच जास्त रस असल्याने ते लोकसभेसाठी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे. आता या मतदारसंघाच्या उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे येणारा काळच सांगेल.