वॉशिंग्टन डीसी: एका १४ वर्षीय मुलाची पाठीवर गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सायरस कारमॅक-बेल्टन असं मृत मुलाचं नाव आहे. अमेरिकच्या दक्षिण कॅरोलिनामध्ये हा प्रकार घडला. मुलानं दुकानातून पाण्याच्या चार बाटल्या चोरल्याचा संशय दुकानदाराला होता. मात्र सायरसनं पाण्याच्या बाटल्या चोरल्या नव्हत्या. तर दुकानातील फ्रिजमध्ये पुन्हा ठेवल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. सायरस पळत असताना दुकानदारानं मागून गोळी झाडत त्याची हत्या केली.जोपर्यंत एखादी व्यक्ती तुमच्यासाठी धोकादायक नसते, तोपर्यंत तुम्ही तिच्यावर मागून गोळी झाडू शकत नाही, असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी ५८ वर्षीय आरोपी रिक चाऊला अटक केली आहे. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. सायरसच्या मृतदेहाजवळ बंदूक सापडली. या गुन्ह्यात चाऊच्या मुलाचादेखील सहभाग असल्याची माहिती उघडकीस आली आहे. सायरसजवळ शस्त्र असल्याचं त्यानं वडिलांनी सांगितलं. सायरसनं चाऊ किंवा त्याच्या मुलावर बंदूक रोखल्याचा कोणताही पुरावा नाही. आरोपी चाऊकडे शस्त्र ठेवण्याचा परवाना आहे. सायरसच्या पाठीवर गोळी झाडण्यात आल्याचं शवविच्छेदनातून समोर आलं आहे. यानंतर चाऊच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘जर त्यानं चार बाटल्या फ्रिजमधून काढल्या, त्यानंतर त्या पुन्हा आत ठेवल्या. यामध्ये गोळी झाडण्यासारखं काहीच नाही. एका १४ वर्षीय मुलाला अशाप्रकारे संपवणं योग्य नाही,’ असं पोलीस अधिकारी लियॉन लॉट यांनी सांगितलं. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप पाहायला मिळाला. दुकानाबाहेर लोकांनी आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांनी चाऊच्या दुकानाची तोडफोड केली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी काही जण दुकानातून सामान चोरी करताना दिसले. त्यांच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ‘एखाद्या व्यक्तीला धोका वाटत असेल आणि जीवाला असलेला धोका टाळण्याचा कोणताच मार्ग नसेल, तरच एखादी व्यक्ती आत्मसंरक्षणासाठी गोळी झाडू शकते, असं दक्षिण कॅरोलिनाचा नियम सांगतो,’ असं पोलिसांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here