Avinash jadhav Drain cleaning tour: प्रत्यक्षात जेव्हा दौरा सुरू होणार तेव्हा मात्र नालेसफाई बऱ्याच अंशी झाल्याचं मनसे कार्यकर्त्यांना लक्षात आलं. मग मात्र, जाधव यांनी अचानक पवित्रा बदलत पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे कारण देत डोंगरी पाडा इथला दौरा केला.
हायलाइट्स:
- नालेसफाईची पाहणी करणं अविनाश जाधवांच्या अंगलट
- महिलांनी प्रश्न विचारत जाधवांना घेरलं
- दौरा आटपत जाधवांचा काढता पाय
ठाणे महानगर पालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वीची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तसेच ठाणे महानगर पालिका क्षेत्रात नाले सफाईची काम मोठ्या युद्ध पातळीवर सुरू आहेत.नालेसफाईचे काम मोठ्या प्रमाणात झाले असल्याचा दावा महापालिकेकडून केला गेला होता. या नाल्यांचा आढावा घेत थेट मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील नालेसफाईची पाहणी देखील केली होती. दुसरीकडे विरोधी पक्षातील नेतेही नालेसफाईची पोलखोल करण्यासाठी नाल्यांची पाहणी करताना पाहायला मिळत आहेत. अशीच नालेसफाईची पाहणी करण्याकरिता बुधवारी ३१ मे रोजी मनसेचे नेते आणि मनसेचे ठाणे पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव हे ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील डोंगरीपाडा येथे गेले होते.
नालेसफाईची पाहणी करून झाल्यानंतर अविनाश जाधव हे परिसरातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी गेले असता, स्थानिकांनी अविनाश जाधव यांना खडेबोल सुनावत “नुसते इथे येऊ नका, काही काम पण करा. २००९ पासून आम्ही इथेच आहोत, नुसते येऊ येऊ करताय.. तुमच्या सोबत आम्ही मानपड्याला फिरलोय” असे सुनावले. मात्र, यावर अविनाश जाधव यांनी “ज्यांना मतदान करता त्यांना सांगा” असं म्हणत “आम्ही निवडून न येताही इथे येतोय” असा पवित्रा घेत महिलांना उत्तर दिलं. त्यानंतर जाधव यांनी पाहणी दौरा आटोपता घेतला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.