धुळे : आजकाल प्री-वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लग्नाआधी वधू आणि वर फोटोशूट करतात. मात्र, अनेक समाजाकडून प्री-वेडिंग फोटोशूटवर बंदी घालण्यासाठी मागणी करण्यात येत आहे. अशात मराठा संघापाठोपाठ श्री शुक्ल यजुर्वेद गोवर्धन ब्राह्मण समाजाकडून प्री-वेडिंग फोटोशूटला विरोध केला जात आहे. मनकर्णिका भवन येथे ही सभा पार पडली.यावेळी २०२३ ते २०२८ नवीन कार्यकारणी निवड, लव जिहाद, प्री वेडिंग अशा विविध सामाजिक विषयांवर चर्चा झाली.

या बैठकीत ब्राह्मण संघाचे अध्यक्ष महेश मुळे यांनी प्री वेडिंग शुटींगवर बंदी घालण्याचा ठराव मांडला. सर्व सहमतीने हा ठराव पास करण्यात आला. यावेळी महेश मुळे यांनी मत मांडले. काळाच्या कसोटीवर व्यवहार्य व उचित न ठरणाऱ्या सामाजिक कुप्रथा एकीकडे बंद केल्या जात असताना दुसरीकडे संपन्नतेच्या प्रदर्शनासाठी नव्या आणि नैतिकतेला उध्वस्त करणाऱ्या प्रथा सुरू आहेत. तेव्हा यातून समाजाची अधोगतीच घडून आल्याखेरीज राहणार नाही. नात्याच्या पवित्रतेवर ओरखडे उमटवू पाहणाऱ्या व मर्यादांची सीमा ओलांडणाऱ्या ‘प्री- वेडिंग शूट’मुळे अनेक अप्रिय घटनांमुळे कौटुंबिक व सामाजिक पातळीवर विवाह व्यवस्था आणि त्यातील मान्यतांनाही आता हादरे बसू लागले आहेत, असं ते म्हणाले.

प्री वेडिंग शूटवर बंदी, लग्नाआधी तरुण-तरुणीला बाहेर फिरण्यास मनाई, ‘या’ समाजाने लादले निर्बंध
समाजाचे नेतृत्व करणाऱ्या धुरिणांनी व संस्थांनीही याबाबत वेळीच सावध होऊन भूमिका घेणे म्हणूनच गरजेचे बनले आहे. हौसेला मोल नाही पण आपले वैयक्तिक आयुष्य याद्वारे इतरांसाठी किती खुलं करावं यात सामाजिक भान असावं. ऐश्वर्याचे व संपन्नतेचे प्रदर्शन मांडू पाहणाऱ्या घटकांकडून हे फॅड पुढे आणले गेले आहे. पण आपणही ते केले नाही तर समाजात आपली गणना मागास म्हणून होईल, असा समज करून घेतलेला वर्गही नाईलाजाने हे फॅड स्वीकारताना दिसतो आहे, असंही मुळे म्हणाले.

मुळे यांच्या निवेदनानंतर एक मुखाने सर्व समाज बांधवांनी ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष महेश मुळे, नव निर्वाचित अध्यक्ष ॲड. रामकृष्ण जोशी, माजी अध्यक्ष सुभाष दिक्षीत , माजी अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी , उपाध्यक्ष प्रा लक्ष्मीकांत जोशी, जया जोशी, विजय पाठक, प्रा.धर्मेद्र पाठक, रघुनाथ पाठक, मेघश्याम दिक्षीत, रमेश जोशी, देवेंद्र पाठक, विजय भट, चेतन जोशी, पुंडलिक चंद्रात्रे, संजय दिक्षीत, राजेश कुलकर्णी, माधवी गोरे, कल्पना जोशी इत्यादी कार्यकारिणी सदस्य व समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here