पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी, माजी आमदार आणि एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष,पंढरपूरचे आधारवड यांचं सोमवारी रात्री निधन झालं. ते ८६ वर्षाचे होते. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यावर ते पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.

सुधाकरपंत परिचारक यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर पंढरपुरात उपचार करण्यात आले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. मात्र काल संध्याकाळी अचानक त्यांना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यातच त्यांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. अखेर काल रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी १०.३० वाजता त्यांच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सुधाकरपंत हे भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते आहेत.

सुधाकरपंत परिचारक यांना एकेकाळी पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. त्यांनी पाच वेळा पंढरपूरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कामही पाहिले होते. मात्र, वयोमानामुळे गेल्या दहा वर्षात त्यांचा राजकीय संपर्क कमी झाला होता. यंदा त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. सहकारी संस्था आणि सहकारी बँका त्यांनी यशस्वीपणे चालविल्या. आजारी कारखाने सुरू करण्यावर त्यांनी अधिक भर दिला होता. त्यामुळे त्यांना सहकार क्षेत्रातील डॉक्टरही म्हटलं जाई. त्यांच्या निधनामुळे ज्येष्ठ आणि अनुभवी लोकनेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here