येथील भौगोलिक परिस्थिती व भुसभुशीत माती यामुळे डोंगर पायथ्याशी असलेल्या घरांवर दरड कोसळण्याच्या धोका असतो. यामुळे या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. मात्र वरील भाग मोठ्या प्रमाणात खाली आल्याने दोन्ही बाजूला अशी भिंत तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले. तरीही या पावसाळ्यात सावधगिरी बाळगत एक मार्गिकाच वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. परशुराम घाटाला पर्यायी मार्ग असलेल्या चिरणी-आमडस रस्ता तयार आहे. तिकडूनही मोठ्या प्रमाणात रहदारी वळवली जाईल असेही चव्हाण यांनी सांगितले.
परशुराम घाटातील काम अंतिम टप्प्यात असले तरी पावसाळ्यापूर्वी येथील काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या घाटातील वाहतूक पावसाळ्यात धोकादायक बनणार असल्याचा अंदाज अनेकांकडून वर्तवला जात होता. पहिल्या पावसात केव्हाही दरड कोसळू शकते अशी भीती खुद्द मंत्र्यांनीच व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसातही प्रवाशांना या मार्गावरून प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊनच घाटातून प्रवास करावा लागणार आहे.