अपघातात दाम्पत्य आणि त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. अपघात पाहून तिथून जाणाऱ्या पादचाऱ्यांना धडकीच भरली. शवविच्छेदनानंतर चौघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी प्रॉपर्टी डीलर राजेंद्र पालविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या.
मूळचे सीतापूरचे रहिवासी असलेले राम सिंह (३५) विकासनगरमधील सेक्टर तीनमध्ये पत्नी ज्ञानवती (३२), मुलगा राज (१३) आणि अंश (८) सोबत भाड्याच्या घरात राहायचे. चौकोनी कुटुंब मंगळवारी रात्री जत्रा पाहायला गेलं होतं. रात्री दोनच्या सुमारास ते स्कूटीवरुन परतत होते. विकासनगरमध्ये असलेल्या वळणावर एका अनियंत्रित एसयूव्हीनं त्यांच्या स्कूटरला धडक दिली.
स्कूटीसोबत संपूर्ण कुटुंब धडकेनंतर एसयूव्हीमध्ये अडकलं. मात्र त्यानंतरही चालकानं कार थांबवली नाही. तो सगळ्यांना फरफटत घेऊन गेला. स्कूटी अडकली असल्यानं एसयूव्ही थांबली. त्यानंतर चालकानं तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळ गाठत सगळ्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
अपघातावेळी प्रॉपर्टी डीलर राजेंद्र पाल दारुच्या अमलाखाली होता. तो भरधाव वेगात एसयूव्ही चालवत होता. कारचा वेळ जवळपास १५० किलोमीटर प्रतितास इतका होता. स्कूटी जमिनीला घासून जात असताना ठिणग्या उडत होत्या. राम सिंह, ज्ञानवती, त्यांचा लहान मुलगा एकापाठोपाठ इकडे तिकडे पडले. राज शेवटपर्यंत अडकला होता. एसयूव्हीनं जिथे धडक मारली आणि एसयूव्ही जिथे जाऊन थांबली, तो रस्ता रक्तानं माखला होता.