भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या सुरक्षा कठड्याला धडकून समृध्दी महामार्गावरील मध्यभागी असलेल्या दुभाजकामध्ये जाऊन उलटली. काल गुरुवारी १ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जालना हद्दीतील चॅनेल क्रमांक ३७४/२०० जवळ हा अपघात घडला. या अपघातात एका नऊ महिन्याच्या चिमुकल्यासह अन्य चारजण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त एकाच कुटुंबातील असून, ते शिर्डीहून दर्शन घेऊन मालेगाव येथे परत जात असताना हा अपघात घडला.
महामार्ग चौकीचे सहायक निरीक्षक अभय दंडगव्हाळे हे महामार्गावर ओव्हर स्पीड वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करत होते. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास समृध्दी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ३७४ जवळ कार क्र. MH 02 EC 6300 छत्रपती संभाजीनगरकडून जालन्याकडे येत असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यावलगतच्या लोखंडी सुरक्षा कठल्याला आदळून महामार्गाच्या दुभाजकामध्ये जाऊन उलटली. या अपघातात रस्त्यावर कारवाई करत असलेले पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले.
या अपघातात चालक गिरीश संतनारायण कोचल्या (३५ वर्ष), पूजा गिरीश कोचल्या (३२ वर्ष), वामिका गिरीश कोचल्या (२ वर्ष), हार्दिक इनानी (९ महिने), प्राली हर्षल इनानी (३५ वर्ष) सर्व रा. मालेगाव यांना किरकोळ मार लागला. महामार्ग पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तत्काळ धाव घेत अपघातग्रस्तांना कारच्या बाहेर काढले. त्यांनंतर रुग्णवाहिकेतून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून क्रेनच्या मदतीने सदरील कार रस्त्यावरून उचलून वाहतूक नियमित केली.