म. टा. प्रतिनिधी, पुणे : शिकण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर वय अडथळा ठरत नाही. लॉकडाउनमध्ये मुलाचं घरी ऑनलाइन शिक्षण सुरू असताना नकळत आईचाही अभ्यासातला रस वाढला. मुलाबरोबर आईनेही गृहपाठाला सुरुवात केली. अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करायची हिच संधी असल्याची जाणीव झाल्याने जिद्दीने आईनेही मुलाबरोबर दहावीची परीक्षा दिली. हलाखीच्या परिस्थितीत कष्टाने मुलाचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या मोनिका तेलंगे आणि मुलगा मंथन दोघेही शुक्रवारी दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.

मोनिका तेलंगे आणि मंथन हडपसर परिसरात राहतात. मोनिका यांनी परीक्षेत ५१.८ आणि मंथन याने ६४ टक्के गुण मिळवले आहेत. मोनिका या कचरा वेचक आहेत. गेल्या आठ वर्षांपासून त्या स्वच्छ संस्थेमार्फत कचरावेचक कर्मचारी म्हणून काम करत आहेत. मोनिका मूळच्या मुंबईच्या. नववीत शिकत असताना मोनिका यांचे लग्न झाले आणि त्या पुण्यात आल्या. संसार आणि मुलांमुळे त्यांना पुढचं शिक्षण घेणे शक्य झालं नाही. सगळं काही सुरळीत सुरू आहे असे वाटत असतानाच आठ वर्षांपूर्वी पतीचे अकाली निधन झाले. एक मुलगा, मुलगी आणि घरची जबाबदारी अचानक अंगावर आली. परिस्थितीमुळे मुलांचं शिक्षण थांबावयचं नाही, हा ध्यास घेऊन त्यांनी घरची कामे सांभाळून त्यांनी कचरावेचक म्हणून कामाला सुरुवात केली. मुलांच्या अभ्यासातही प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली.

दापोलीच्या मनिषला छप्परफाड गुण, सर्वच विषयात पैकीच्या पैकी, १०० टक्के मिळवून बोर्डात पहिला
लॉकडाउनमध्ये सर्व काही बंद असल्याने मंथन घरी बसून ऑनलाइन शिक्षण घेत होता. घरात काम करताना शिक्षक शिकवत असलेले धडे माझ्या कानावर पडत होते. शाळा संपल्यावर मी त्याचा अभ्यास घेत असे. याच काळात माझाही अभ्यासातला रस वाढला. लहानपणापासून मला शिकायचे होते, पण परिस्थितीमुळे शक्य झाले नाही. मुलगा दहावीत गेला त्याच वेळी मी देखील परीक्षेचा फॉर्म भरायचं ठरवलं. आम्ही दोघांनी मिळून अभ्यास केला. मला अवघड वाटणाऱ्या गोष्टी मंथनने मला शिकवल्या. त्याला येत नसलेले मी शिकवले. दोघांनी मिळून गृहपाठ केला. आज परीक्षेचा निकाल हातात मिळाल्यावर शब्दात सांगता येणार नाही एवढा आनंद झाला, अशी भावना मोनिका तेलंगे यांनी व्यक्त केली.

एकाच घरात राहिले, एकत्रच अभ्यास केला, एक मार्क इकडे की तिकडे नाही, अगदी सेम टू सेम…!
मुलाला डॉक्टर बनवायचं

लहानपणापासूनच शिकायची आवड होती, पण परिस्थितीमुळे ते शक्य झाल नाही. मुलानं मला आग्रह करून परीक्षेला बसवलं. त्याच्यामुळे माझं स्वप्न पूर्ण झालं. मी पुढे शिकेन की नाही माहिती नाही, पण मुलाला डॉक्टर व्हायचं आहे, त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हवे तेवढं कष्ट करायची माझी तयारी आहे- मोनिका तेलंगे

आई माझा अभ्यास घेत असताना, मी तिला प्रत्येक वेळी तुला जमेल, ऐक तू.. दहावीची परीक्षा दे असं सांगत होतो. ती परीक्षा पास होईल मला माहिती होते. आमच्या हट्टामुळे तिने दहावीचा फॉर्म भरला. सगळी काम सांभाळून माझ्याबरोबर अभ्यास केला. आज माझ्याबरोबर तिच्याही हातात गुणपत्रिका बघताना खूप छान वाटतं आहे- मंथन तेलंगे

आठवड्यातून एक-दोन तास शाळा, घर, काम आणि नातवंडांना सांभाळून ५९ व्या वर्षी दहावीत उत्तीर्ण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here