पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तातडीने मदत पथके ओडिशाकडे रवाना केली. बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (१२८६४) बहानगा बाजार येथे रुळांवरून घसरल्याने तिचे डबे रुळांवर पडले होते. हे डबे शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसला (१२८४१) धडकले. त्यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे एका मालगाडीला धडकले. अपघाताचे ठिकाण हावड्यापासून २५५ किलोमीटरवर आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वेच्या घसरलेल्या डब्यांमध्ये अनेक प्रवासी अडकले होते. स्थानिक रहिवाशांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. अंधारामुळे मदत कार्यात अडथळे आले. अपघातातील १३२ जखमींना सोरो, गोपालपूर, खांटपाडा येथील सरकारी हॉस्पिटलांत हलविल्याची माहिती ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली. महसूलमंत्री प्रमिला मलिक आणि विशेष सहाय सचिव सत्यव्रत साहू यांना घटनास्थळी जाण्याचा आदेश मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दिला.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून अपघाताबाबत सविस्तर माहिती घेतली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य राबविण्यात येत आहे. आपद्ग्रस्तांना सर्वतोपरी साह्य देण्यात येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईंकांना १० लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. तर, अपघातामधील गंभीर जखमींना २ लाख रुपये तर किरकोळ जखमी असणाऱ्या प्रवाशांना ५० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आहे.