म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांना शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता ते चक्क थुंकल्याची घटना घडली. शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांना विविध प्रश्न विचारले. या दरम्यान काही पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा हवाला देत केलेल्या प्रश्नाला उत्तर न देता राऊत थुंकले. भर पत्रकार परिषदेत वाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोरच राऊत यांनी ही कृती केली.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परदेश दौऱ्यावर टीका केली होती. उष्णता सहन होत नसल्याने ते परदेशात गेले असतील, या त्यांच्या वक्तव्याबाबत राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. राऊत यांनी हा प्रश्न ऐकल्यानंतर असे कोण म्हणाले, असा प्रतिप्रश्न केला. त्यावर, पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच उत्तर देण्याऐवजी राऊत यांनी थुंकण्याची कृती केली. त्यांच्या या कृतीवर आता शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

शिंदे-पवार भेटीने कोणतंही वातावरण ढवळलेलं नाही, मुख्यमंत्र्यांचं सिंहासन आधीच हललं आहे; संजय राऊतांनी डिवचलं

वरातीत नाचण्यावरून दोन गटात वाद, दलित तरुणाची हत्या, ॲट्रॉसिटीचा दणका, ७ जण जेलमध्ये

‘संजय राऊत यांनी घृणास्पद वागणुकीतून आता सर्व मर्यादा आता ओलांडल्या आहेत. त्यांचे संवाद हे राजकीय विरोधकांबद्दल द्वेषाने भरलेले आहेत आणि महाराष्ट्राची संस्कृती सार्वजनिकरित्या दुषित करणारे जंतू आहेत. श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्धच्या घृणास्पद वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. पण पवार आणि ठाकरे यांनी दुर्लक्ष केल्याने राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळल्याचेही आपल्याला समजते. त्यांनी आता मानसिक रुग्णालयात चांगले आणि योग्य उपचार घ्यावेत. आम्ही त्यांना ठाण्यात दाखल होण्यासाठी मदत करू शकतो’, असे प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आले.

‘आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत’

‘महाविकास आघाडीत लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे जागावाटप सुरळीतपणे पार पडेल. कोणाला चिंता वाटण्याचे कारण नाही. प्रत्येक जागेची कारणमीमांसा होईल. कोण जिंकू शकते, एकमेकांना कशी मदत करायची त्यावर चर्चा होईल. आमच्यात कोणतेही मतभेद होणार नाही. वज्रमूठ कायम राहील. तसेच रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. त्याचे स्वागत आहे. आपण शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य चालवतो. शिवाजी महाराज जगाचे दैवत आहे. त्यांचा राज्याभिषेक सोहळा अत्यंत देखणा करणे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे’, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत म्हणाले. शिवरायांनी सर्वांना सोबत घेऊन विश्वास देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, असा टोला राऊत यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here