गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड तोलणार पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, ‘नामांतराबाबत काय निर्णय घ्यावा हा सरकारचा अधिकार आहे. सध्यस्थितीत अहमदनगरचे नामांतर व्हावे, यासाठी कोणतेही आंदोलन करण्यात आले नव्हते; तसेच तशी मागणीही नव्हती. यापूर्वी सत्तेत असताना सरकारने धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. तो पूर्णत्वाला न गेल्याने नामांतराचा विषय पुढे आणला गेला. नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव मिळाले, ही स्वागतार्ह बाब आहे.’
‘डॉक्टरांचे म्हणणे ऐकून घ्या’
‘मुंबई येथील जे. जे. रुग्णालयाच्या काही डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत; तसेच, तेथील डॉक्टर सामूहिक रजेवर गेल्याने रुग्णांना फटका बसत आहे. सरकारने यावर मार्ग काढणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी सरकार कमी पडत असल्याचे दिसून येते. ही बाब अतिशय गंभीर असून, डॉक्टरांचे म्हणणे ऐकून घेण्याची गरज आहे,’ असेही पवार यांनी नमूद केले.
‘सक्षम उमेदवार देऊ’
पुणे लोकसभेची पोटनिवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत कुठल्या जागा कोणाच्या वाट्याला येतात, हे निश्चित होईल. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या जागांवर सक्षम उमेदवार दिला जाईल, असेही पवार म्हणाले.
‘अदानी नेहमीच पवारांना भेटतात’
उद्योगपती गौतम अदानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अनेकदा भेटतात. उद्योग करताना येणाऱ्या समस्या; तसेच विविध प्रश्नांबाबत या भेटीमध्ये चर्चा होते. उद्योगपतींबरोबरच राज्यातील विविध व्यक्ती आपले प्रश्न मांडण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतात. त्यामुळे यावर फार चर्चा करण्याची गरज नाही. राज्याचा मुख्यमंत्री कोणीही असो; प्रश्न सोडवण्यासाठी भेट घ्यावी लागते. देशातील विविध राज्यांमध्ये अदानी सध्या गुंतवणूक करीत आहेत. महाराष्ट्रातही त्यांचे काही प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे ते राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतात, असेही पवार म्हणाले.