मुंबई: मुकेश अंबानी, रतन टाटा यांच्यासह प्रमुख उद्योगपतींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. मात्र या बैठकीपासून उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना दूर ठेवण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने याबाबत माहिती दिली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकार चालवत आहेत की शिवसेना चालवत आहेत?, असा सवाल या नेत्याने केला.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार विराजमान झाल्यानंतर देशातील प्रमुख उद्योगपतींसोबत पहिली अधिकृत बैठक असल्याने या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नव्या सरकारसाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी बैठक होती. मात्र ही बैठक पूर्णपणे शिवसेनामय होती असे दिसून आले. मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्धव यांचे पुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब हे या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदीही या बैठकीला हजर होत्या. त्यामुळेच या बैठकीचे फोटो राष्ट्रवादी व काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षांची अस्वस्थता वाढवणारे ठरले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या बैठकीचे आमंत्रण होते की नाही, हे कळू शकले नसले तरी त्यांना जाणीवपूर्वक बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. अजित पवार याच्याकडे अर्थ व नियोजन खाते असल्याने या बैठकीला त्यांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र, त्यांना टाळून बैठक घेण्यात आल्याने महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार नाराज आहेत व ते आपली नाराजी उद्धव यांच्या कानावर घालणार आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीच्या एका जबाबदार नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर उद्योगपतींच्या बैठकीच्या अनुशंगाने अनेक प्रश्न उपस्थित केले. उद्धव ठाकरे हे आता सरकारचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षप्रमुखाच्या भूमिकेपलीकडे जाऊन काम करावे, अशी अपेक्षा आहे. त्यांना पक्ष नाही सरकार चालवायचे आहे, याचे भान असू दे, असे हा राष्ट्रवादीचा नेता म्हणाला. या बैठकीला प्रियांका चतुर्वेदी का उपस्थित होत्या?, असा सवालही या नेत्याने केला.

उद्योगपतींच्या बैठकीत काय झालं?

राज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योगपतींची भेट घेतली. उद्योगांना येणाऱ्या सर्व अडचणी व समस्या दूर करणार, तसेच राज्यातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी उद्योग क्षेत्रातील प्रमुखांना दिली. राज्य शासन आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री शासकीय अतिथीगृहात ही बैठक झाली. या बैठकीला रतन टाटा, मुकेश अंबानी, उदय कोटक, आनंद महिंद्रा, आदी गोदरेज, हर्ष गोयंका, मानसी किर्लोस्कर, राजेश शाह, आनंद पिरामल, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, वरुण बेरी, महेंद्र तुराखिया, रवी रहेजा, बाबा कल्याणी, गोपिचंद हिंदुजा, सज्जन जिंदाल, गौतम सिंघानिया आदी उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here