डहाणू तालुक्यातील कांदरवाडी येथील रहिवासी नवश्या रिश्या पटारा हे ज्येष्ठ नागरिक २०१९मध्ये राहत्या घरून बेपत्ता झाले. घरच्यांनी त्यांचा शोध घेतला, मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. लॉकडाउनची स्थिती आणि या कुटुंबातील सदस्य अशिक्षित असल्याने पोलिस तक्रार केली नव्हती. साडेतीन वर्षांचा दीर्घकाळ तसेच करोनाकाळात घडलेले अनेक मृत्यू यामुळे पटारा कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नवश्या यांना देवाज्ञा झाली असल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी या भावनेपोटी कुटुंबीयांनी त्यांचा दशक्रिया विधी आटोपला. २७ मे रोजी नवश्या जिवंत असल्याची माहिती पटारा कुटुंबीयांना मिळाल्यावर सर्वांच्याच डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते.
मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले भारतीय सेना दलातील जवान शेख वसीम शेख आबेद हे नेपाळ सीमेलगत उत्तराखंड जिल्ह्यात पिथोरागढ परिसरात कर्तव्यावर आहेत. तेथे भिक्षा मागणाऱ्या ज्येष्ठ नागरिक नवश्या पटारा यांच्याकडे त्यांचे लक्ष गेल्यानंतर त्यांनी चौकशी केली. तेव्हा ते डहाणू तालुक्यातील कांदरवाडी इथले रहिवासी असल्याची माहिती मिळाली. वसीम शेख यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून ही माहिती शेअर केली. वसीम खान यांचे वर्गमित्र विलास सपकाळ यांनी ही माहिती वाचली, ते डहाणू तालुक्यात एका शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी खान यांच्याशी संपर्क साधल्यानंतर मिळालेली माहिती कांदरवाडीत कार्यरत शिक्षक रविंद्र गिरी यांना दिली. गिरी यांनी पटारा कुटुंबीयांना भेटून नवश्या हे उत्तराखंड येथे सुखरूप असल्याचे सांगितले. त्यानंतर पटारा कुटुंबीयांसह शेजारी आणि ग्रामस्थ यांना नवश्या यांच्या घरवापसीचे वेध लागले. कांदरवाडी गृप ग्रामपंचायत, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट (विवळवेढे) तसेच काही सजग नागरिकांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. तर, या गावचे राजा गवळी आणि नारायण आहाडी हे उत्तराखंडला गेले आहेत.