वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील कैलासनगरमध्ये प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. विनायक सुरेश जाधव (वय १९, रा. घोटी) असे संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयाने सहा जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जाधवने विद्यार्थिनीला ढकलले, की तिनेच उडी मारली याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. कैलासनगरमध्ये राहणारी विद्या हनुमान काळे (वय १६) हिला बुधवारी (दि. ३१) रात्री राहत्या घरासमोरील इमारतीवरून ढकलण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या विद्यार्थिनीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळी तिने कुटुंबीयांशी साधलेल्या जेमतेम संवादात संशयिताचे नाव घेतले. गुरुवारी (दि. १) सायंकाळी सात वाजता तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता तिचे वडील हनुमान शाहूराव काळे (वय ४०) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करून सहायक पोलिस निरीक्षक निखिल बोंडे यांच्या पथकाने जाधव याला अटक केली.
दहावीत मिळाले ५७ टक्के
काळे कुटुंबीय मूळचे परभणी येथील आहे. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करतात. एकुलती मुलगी असल्याने विद्याला उच्चशिक्षित करण्यासाठी आई-वडील प्रयत्नशील होते. शुक्रवारी सकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुपारी एक वाजता दहावीचा निकाल लागल्यावर विद्याला ५७ टक्के गुण मिळाले. मात्र, निकालापूर्वीच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी सायंकाळी तिचे आई-वडील भाजी खरेदीसाठी गेले होते. घरी परतल्यावर गाडी उभी करी असतानाच समोरील इमारतीच्या गच्चीवरून विद्या खाली कोसळली होती.
इन्स्टाग्रामवर चॅटिंग
मृत विद्या आणि संशयिताचे सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते, असे पोलिस तपासात पुढे येत आहे. इन्स्टाग्रामवर त्यांची ओळख झाल्यानंतर चॅटिंगमध्ये वाढ झाली. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात वाद झाले. पासवर्ड एकमेकांना देणे, इतरांशी होणारे चॅटिंग यातून त्यांच्याच वाद झाल्याचे तपासात पुढे येत आहे. त्यातून भेटीदरम्यान झालेल्या वादातून संशयिताने विद्याला धक्का दिल्याचा संशय आहे. पोलिसांनी दोघांच्या मोबाइलचा ‘सीडीआर’ मागविला आहे. त्यातून येणाऱ्या लोकेशनच्या माहितीनुसार गुन्ह्यातील खरे तथ्य उकलण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्याहदे यांनी सांगितले.