सोने खरेदीचे नियम बदलले
सोन्याचे दागिने किंवा नाणी खरेदी करताना नेहमी त्याच्या शुध्दतेबाबत मनात नेहमी प्रश्न उपस्थित होतो. खरेदीदारांची ही चिंता लक्षात घेऊन हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. यापूर्वी चार अंकी हॉलमार्क अनिवार्य होता, जो १ एप्रिल २०२३ पासून ६-अंकी HUID क्रमांकावर बदलला गेला आहे. भारतीय मानक ब्युरोने (BIS) ६ अंकी शब्द आणि संख्यांच्या हॉलमार्कसह अद्वितीय ओळख क्रमांक (HUID) अनिवार्य केला असून याशिवाय कोणताही ज्वेलर सोन्याचे दागिने किंवा नाणी विकू शकणार नाही.
HUID क्रमांकाशिवाय सोने विकल्यास कारवाई
BIS ने जुना चार अंकी हॉलमार्क बदलून ६ अंकी HUID अनिवार्य केले असून आता ६ अंकी HUID क्रमांकाशिवाय सोन्याचे दागिने किंवा नाणी विकणाऱ्या ज्वेलर्सवर कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये शिक्षा आणि दंड दोन्हीची तरतूद आहे.
घरातील जुन्या दागिन्यांचं काय होणार?
सरकारच्या या नियम बदलानंतर आता घरातील तिजोरीत ठेवलेल्या जुन्या दागिन्यांचे काय होईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? ज्या दागिन्यांमध्ये ६ अंकी HUID क्रमांक नाही त्यांचे काय होईल? तर लक्षात घ्या की आता या क्रमांकाशिवाय दागिने विकता येणार नाहीत. ज्या लोकांकडे जुने किंवा हॉलमार्क नसलेले दागिने आहेत त्यांच्याकडे आता दोनच पर्याय आहेत.
पहिला पर्याय म्हणजे BIS नोंदणीकृत ज्वेलर्सकडे जाऊन जुन्या दागिन्यांचे हॉलमार्क करून घेणे. आणि दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या दागिन्यांची BIS मान्यताप्राप्त असेईंग अँड हॉलमार्किंग सेंटरमध्ये चाचणी करून घेणे आणि तुमच्या दागिन्यांचे हॉलमार्क करून घेणे.
सोन्याचा हॉलमार्कचा सर्वाधिक फायदा कुणाला?
सोन्याचे दागिने किंवा नाण्यांवरील हॉलमार्क नियमांचा फायदा ग्राहकांना होईल. हॉलमार्क दागिन्यांवर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सचा (BIS) लोगो असतो, ज्यावर सोन्याचे दागिने किती कॅरेट आहेत याची माहिती दिली जाते. हॉलमार्क सोन्यावर BIS चिन्हही असते, जे सोन्याच्या शुद्धतेची हमी देते. कॅरेट आणि शुद्धतेनुसार हॉलमार्किंग सेंटरद्वारे त्यांना चिन्हांकित केले जाते.
सोन्याचे हॉलमार्किंग करण्यासाठी किती खर्च येईल?
जुन्या दागिन्यांची विक्री किंवा बदली करण्यासाठी आता सोन्याचे हॉलमार्किंग आवश्यक असून यासाठी तुम्हाला नाममात्र रक्कम खर्च करावा लागेल. तुम्हाला दागिन्यांच्या प्रत्येक तुकड्यासाठी ४५ रुपये खर्च करावा लागेल. BIS केंद्रात विविध मानके आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे सोन्याची चाचणी केली जाईल आणि त्यानंतर त्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. जेव्हा तुम्ही सोन्याचे दागिने विकायला किंवा बदली करायला जाल तेव्हा तुम्हाला प्रमाणपत्र दाखवावे लागेल.