रायगड : कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टेमघर या गावामध्ये एका २४ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका अशोक शिंदे असे या आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे.याबद्दल सविस्तर माहिती अशी की, आरोपी विकास अशोक शिंदे आणि प्रियंका अशोक शिंदे यांचा २०१९ मध्ये विवाह झाला होता. विवाह झाल्यापासून पती विकास अशोक शिंदे हा पत्नी प्रियांकाला नेहमी मारहाण व शिवीगाळ करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. तसेच तिचा छळ करून तिला नांदवायला नेणार नाही असे वारंवार सांगत होता.अखेर या सर्व जाचाला कंटाळून प्रियंकाने टोकाचे पाऊल उचलत आपले आयुष्य संपवले. टेमघर येथील स्वतःच्या शिलाई दुकानात प्रियंका हिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी पती विकास अशोक शिंदे (वय २७ रा. टेमघर तालुका महाड. मूळ रा. मोरगाव जिल्हा पुणे) याच्या विरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित आरोपी विकास शिंदे हा पुणे परिसरातील एका कंपनीत कामाला आहे. दरम्यान, या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपी असलेल्या पतीला अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here