पुणे : नांदेडच्या बोंढार हवेली गावातील बौद्ध तरुण अक्षय भालेरावच्या खून प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. गावात भीम जयंती कशी काय साजरी केली? असा प्रश्न विचारुन आणि त्याचा राग मनात ठेऊन गावातील सवर्णांनी अक्षयची हत्या केल्याचा त्याच्या कुटुंबियांचा आरोप आहे. अक्षय भालेराव खून प्रकरणातील ९ आरोपींवर अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले असून ७ आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. दोन आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या खून प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आरोपींना त्यांची जागा दाखवा, असं म्हटलं.

अक्षय भालेराव खून प्रकरणातील अटक असलेल्या सात आरोपींना न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी रात्री बोंढार हवेली गावात लग्नाच्या वरातीदरम्यान झालेल्या वादात २४ वर्षीय अक्षय भालेराव या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरुन ९ आरोपी विरुद्ध हत्या आणि ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरातीत नाचण्यावरून दोन गटात वाद, दलित तरुणाची हत्या, ॲट्रॉसिटीचा दणका, ७ जण जेलमध्ये
शरद पवार काय म्हणाले?

नांदेडची घटना अत्यंत निंदनीय आहे. ही घटना महाराष्ट्राला शोभणारी नाही, असं सांगतानाच राज्य सरकारने या घटनेच्या खोलात जाऊन जे कुणी गुन्हेगार असतील त्यांना त्यांची जागा दाखवावी. सरकारने या खून प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असं शरद पवार म्हणाले.

घटना नेमकी काय?

बोंढार हवेली गावात आंबेडकर जयंती कशी काय साजरी केली? यावरुन अक्षयचा खून झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. तर लग्नाच्या वरातीत दोन गटात वाद होऊन त्यात अक्षयचा खून झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

नांदडच्या तरुणाची हत्या कशी झाली? कुटुंबियांचा आरोप काय? पोलिसांचा FIR जसाच्या तसा…
आंबेडकर जयंती साजरी केल्यावरुन गावातील सवर्ण समाजाचा अक्षयवर राग होता. लग्नाच्या वरातीवेळीच अक्षय किराणा दुकानात सामान घेण्यासाठी आला होता. त्यावेळी वरातीत नाचणाऱ्या सवर्ण समाजातील मुलांनी अक्षयला जातिवाचक शिवीगाळ केली आणि तिथेच अक्षयचा निर्घृण खून केला. यावेळी त्यांनी बौद्ध वस्तीवरही हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला, दगडफेक केली, असा आरोप अक्षयच्या कुटुंबियांनी केलाय. तशी तक्रार त्यांनी नांदेड ग्रामीण पोलिस स्थानकात दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here