म. टा. विशेष प्रतीनिधी, नवी दिल्ली/कोलकाता : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २८८वर पोहोचली आहे. बालासोर जिल्ह्यात शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने आणि मालगाडीला धडकल्याने हा अपघात झाला होता. या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला असून, ८०३ जण जखमी झाले आहेत. यापैकी ५६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे असून, सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.ओडिशात शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेतील कोरोमंडल एक्स्प्रेस आपला नियोजित ट्रॅक बदलून पर्यायी मार्गिकेमध्ये (लूप लाइन) घुसली आणि बहानगर बाजार स्थानकाच्या पुढे मुख्य मार्गाऐवजी तेथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. यामुळे एक्स्प्रेसचे डबे बाजूच्या मार्गिकेवर कोसळले. या अपघातानंतर बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाडीच्या डब्यांना धडकली, असे रेल्वे मंडळाच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. रेल्वेच्या चौकशीत घोळ उघड
कोरोमंडल एक्स्प्रेसला मेन लाइनसाठी आधी हिरवा व नंतर काही क्षणांतच पुन्हा लाल सिग्नल देण्यात आला. मात्र, त्याचवेळी ही एक्स्प्रेस मालगाडी उभ्या असलेल्या पर्यायी मार्गिकेवर वेगात पोहोचली व अपघात घडला.
१७ डब्यांचा चक्काचूर, ११०० जखमी
‘कोरोमंडल’मध्ये १२५७; तर बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये आरक्षित तिकीट असलेले १०३९ असे एकूण २२९६ प्रवासी होते. १७ डब्यांचा चक्काचूर होऊन ११००हून अधिक प्रवासी जखमी झाले.
बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि एक मालगाडी यांच्यात शुक्रवारी झालेला भीषण तिहेरी अपघात हा स्वातंत्र्यानंतर झालेल्या सर्वांत भीषण अपघातांपैकी एक ठरला आहे.