लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी गोपीनाथ गडावर रामायणाचार्य ढोक महाराज यांचे कीर्तन आणि विविध कार्यक्रम झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. दरम्यान, लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठी गर्दी उसळली होती. व्यासपीठावर खासदार डॉ. प्रीतम मुंडे, यशःश्री मुंडे, गौरव खाडे, आर्यमान पालवे, अगस्त्य खाडे हे कुटुंब आणि खासदार सुजय विखे, महादेव जानकर, पाशा पटेल, आमदार सुरेश धस, आमदार मोनिका राजळे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार नमिता मुंदडा, माजी आमदार भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख, नरेंद्र पवार, राधाताई सानप, अक्षय मुंदडा, देविदास राठोड, रमेश आडसकर आदी उपस्थित होते.
पंकजा म्हणाल्या, की आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आहे. या दिवशी माझ्यासाठी राजकारण शून्य आहे. याठिकाणी जे लोक आले आहेत, त्यांना मी काही दिले नाही. मी या वेळी कोणत्याही राजकारण्यांना निमंत्रित केलेले नाही. कोणत्याही मोठ्या नेत्यांला बोलावले नाही. मी फक्त भजन कीर्तन आणि मुंडे साहेबांवर निष्पाप प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम ठेवला आहे.
दरम्यान, स्मृतिदिनानिमित्त गडावर रक्तदान शिबिर तसेच गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व नाम फाउंडेशनतर्फे कन्हेरवाडी व कौठळी याठिकाणी नाला खोलीकरण कामाला पंकजा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरवात करण्यात आली. अपघातमुक्त परळी अभियानांतर्गत चारचाकी वाहनांना रिफ्लेक्टरही बसविण्यात आले.
अमित शहा यांच्याशी बोलणार: पंकजा मुंडे
गेल्या पाच वर्षांमध्ये अनेकांचा पराभव झाला, पण तरीही त्यांना आमदारकी, मंत्रिपदे मिळाली. त्यामुळे जी परिस्थिती आणि संभ्रम निर्माण झाला तो माझ्यामुळे निर्माण केलेला नाही. आता वरिष्ठ नेत्यांशी मनमोकळी चर्चा करणार असून अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे. कुणाच्या, तरी खांद्यावर बंदूक ठेऊन बंदूक चालवण्याएवढे खांदे अजून तरी मला मिळाले नाहीत. मात्र, माझ्या खांद्याची रुंदी इतकी आहे की, अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसावण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, त्या बंदुकांना मी माझ्या खांद्यावर विसावू देणार नाही.
एकनाथ खडसेंबरोबर चर्चा
राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे, त्यांची कन्या रोहिणी खडसे गोपीनाथ गडावर दाखल झाले होते. त्यावेळी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.