तळकोकणात ‘शासन आपल्या दारी’ योजनेची सुरुवात करण्यासाठी मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा दौरा करणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सावंतवाडीतील संत गाडगेबाबा मंडई परिसर व अन्य ठिकाणी होणार आहे; परंतु हा कार्यक्रम कुडाळ येथे झाला पाहिजे असा आग्रह भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे.
आता सावंतवाडीत संत गाडगेबाबा मंडई परिसर व अन्य ठिकाणी भूमिपूजनाचे कार्यक्रम होणार असून, त्यानंतर कुडाळमध्ये शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. केसरकर यानी आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची आखणी केली होती. तथापि, राणे यांनी कुडाळचा कार्यक्रम प्रतिष्ठेचा केला आहे. यामुळे कार्यक्रमाची जागा ऐनवेळी बदलण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
राणेंच्या दबावापुढे केसरकरांचे नमते
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. भाजपपुढे शिंदे गट नमला, त्यामुळेच दीपक केसरकर यांचा विरोध डावलून नारायण राणे यांनी आपल्या मुलाला पुढे आणण्यासाठी केसरकर यांना शह दिल्याचा दावा वैभव नाईक यांनी केला आहे. केसरकर यांनी यावर अधिक बोलण्याचे टाळले आहे. राणे हे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांची इच्छा असेल, तर आपण हा कार्यक्रम कुडाळला घेऊ. मात्र, दोन कार्यक्रम घेण्याऐवजी एकच कार्यक्रम घेऊ. त्यामुळे आपली एकी दिसेल असे म्हणण्याची वेळ केसरकर यांच्यावर आली आहे.