करोना काळापासून वंडर पार्क बंद होते. त्यानंतर या पार्कच्या डागडुजीसाठी आणि सुशोभीकरणासाठी, २३ कोटी रुपये खर्चून, पार्क नव्याने सुरू करण्यात आले आहे. १ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पार्कमधील सेवासुविधांचे लोकार्पण करण्यात आले. मात्र या पार्कमधील काही कामे शिल्लक होती. त्यामुळे पालिका प्रशासन पार्क सुरू करण्याच्या तयारीत नव्हते. मात्र स्थानिक नगरसेवक आणि नेते मंडळींनी दबाव टाकत या पार्कच्या लोकार्पणासाठी पालिकेकडे तगादा लावला होता. पालिकेने पार्क सुरू केले नाही तर थेट पार्कमध्ये घुसून सेवासुविधांचे उद्घाटन करण्याची तयारीही करण्यात आली होती. मात्र पालिकेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टळला. मात्र राजकीय नेत्यांच्या दबावामुळे अखेर पालिकेने दुसऱ्या दिवशी या पार्कमधील सेवा सुविधांचे लोकार्पण केले.
सखोल चौकशीचे आयुक्त राजेश नार्वेकर यांचे निर्देश
स्काय स्विंगर या पाळणा स्वरूपातील राइडवर शनिवारी अपघात घडला व सात व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली. त्यांना त्वरित नजीकच्या रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या प्रकरणाची पालिका आयुक्तांकडून दखल घेतली गेली असून या घटनेची सखोल चौकशी करून, संबंधितांवर दोषींवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. वंडर्स पार्क अंदाजे १५ जूनपासून बंद राहणार असल्याने, मुलांच्या सुट्टीचा कालावधी लक्षात घेता नागरिकांच्या मागणीनुसार वंडर्स पार्क नागरिकांसाठी खुले राहणार असून त्यामधील केवळ स्काय स्विंगर ही राइड या कालावधीत बंद असणार आहे. वंडर्स पार्क मधील नागरिकांच्या सुरक्षेतेबाबत अधिक दक्ष राहण्याचे काटेकोर निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.