वृत्तसंस्था, बालासोर: कोरोमंडल एक्स्प्रेसला बहानगा बाजार (जि. बालासोर) येथे झालेल्या अपघातानंतर आता रेल्वेमार्ग सुरळीत करण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत. बुलडोझर आणि क्रेन या यंत्राच्या साह्याने रेल्वेचे पथक तेथे अहोरात्र काम करीत आहे.

किनारी भागातून जाणारा आणि पूर्व आणि दक्षिण भारताला जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्यामुळे त्याची दुरुस्ती लवकर करून तेथून दळणवळण सुरू करण्यास रेल्वेने प्राधान्य दिले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान अपघातस्थळी तळ ठोकून आहेत. ‘रेल्वेमार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एक लाइन सुरू करणे, सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती ही काम जवळपास पूर्ण होत आली आहेत. ओव्हरहेड विद्युतीकरणाचे काम सुरू असून, तेही लवकर संपेल,’ असे वैष्णव म्हणाले.

‘आमची पथके अपघातस्थळी अहोरात्र काम करीत आहेत. शक्य तेवढ्या लवकर मार्ग पूर्ववत केला जाईल,’ असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘अपघातग्रस्त रेल्वेचे सर्व म्हणजे २१ डबे रुळावर आणण्यात आले आहेत. डाउन मार्गावरील (कोलकाता बाजूकडील) ओव्हरहेड केबल आणि मास्ट बसविण्याचे काम सुरू आहे. अजून तीन रेल्वे वॅगन आणि इंजिन रुळावर आणणे बाकी आहे,’ अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Odisha Accident: कोरोमंडल १२८ च्या वेगाने धडकली अन् डबे पत्त्यासारखे विखुरले; रेल्वेने सांगितलं अपघाताचं कारण

विनातिकीट प्रवाशांनाही रेल्वेकडून भरपाई

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, तिकीट नसलेल्या अपघातग्रस्त प्रवाशांनाही भरपाई मिळेल, असे रेल्वेने रविवारी स्पष्ट केले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये, गंभीर जखमींसाठी दोन लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याअंतर्गत आत्तापर्यंत ३.२२ कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रविवारी केली. गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ही कामे युद्धपातळीवर

– रुळांची दुरुस्ती

– ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरची दुरुस्ती

‘एम्स’चे पथक भुवनेश्वरमध्ये

नवी दिल्ली : ओडिशातील रेल्वे अपघातातील जखमींवर उपचारांसाठी येथील ‘एम्स’मधील डॉक्टरांची तुकडी हवाई दलाच्या विशेष विमानाने भुवनेश्वरला रवाना झाली आहे. या पथकासोबत औषधे आणि क्रिटिकल केअरसाठीची उपकरणे पाठविण्यात आली आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया ओडिशातच आहेत.

Odisha Accident: माझ्या भावाशी बोलणं करुन द्या; अखेरची इच्छा पूर्ण होताच ट्रेनमध्ये ललितने सोडले प्राण

‘सर्वच स्तरांवर जबाबदारी निश्चित करा’

नवी दिल्ली : ओडिशा रेल्वे अपघाताबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी एकामागोमाग ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली. रेल्वे सुरक्षेकडे लक्ष न देता मोदी रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात व्यग्र होते. प्रसिद्धीच्या हव्यासाने मोदी सरकारची कार्यप्रणाली पोकळ झाली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्वच स्तरांवर जबाबदारी निश्चित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

चौकशी आयोगाच्या मागणीसाठी याचिका

नवी दिल्ली : ओडिशामधील रेल्वे अपघाताची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोग नेमण्याचे आदेश केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तातडीने आयोग स्थापन करण्याचे निर्देश केंद्राला देण्यात यावेत, अशी मागणी अॅड. विशाल तिवारी यांनी याचिकेत केली आहे. रेल्वे यंत्रणेतील जोखीम आणि सुरक्षितता मापदंडांचे विश्लेषण आणि पुनरावलोकन करण्यासाठी या आयोगामध्ये तांत्रिक सदस्यांचा समावेश असावा, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.

कोरोमंडल एक्सप्रेसच्या भीषण अपघातानंतर ५१ तासांनी स्थिती पूर्ववत, पहिली ट्रेन रवाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here