वेकोलि चंद्रपूर क्षेत्रांतर्गत दुर्गापूर खाण सर्वाधिक कोळसा उत्पादन करणारी आहे. हल्ली खाणीतून चंद्रपूर वीज केंद्राला वर्षाकाठी सुमारे १७ लाख मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा केला जात आहे. मात्र खाणीचे चार ते पाच वर्षे एवढेच आयुर्मान उरले होते. पुढे व्यवस्थापनापुढे विस्तारीकरणाचा प्रश्न उभा होता. त्यामुळे लगतची १२१.५८ हेक्टर वनजमीन मिळविणे हा एकच पर्याय उरला होता. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. प्रस्तावास मंजुरी मिळेल, याकरिता वेकोलिचा खटाटोप सुरू होता. मात्र, वन आणि पर्यावरणाच्या जाचक अटी आड येत होत्या. पण अलीकडेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वन्यजीव मंडळ, स्थायी समितीची दिल्ली येथे झालेल्या ७२ व्या बैठकीत दुर्गापूर खुल्या कोळसा खाण विस्ताराकरिता १२१.५८ हेक्टर वनजमीन वळविण्याच्या शिफारशीचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीने काही अटींवर प्रस्तावाची शिफारस केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे खाणीच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. खाणीची १२ वर्षे कालमर्यादा वाढेल अशी माहिती समोर आली आहे.
सदर खाण १३ वर्षांपूर्वी येऊ घातलेल्या अदानी कोळसा ब्लॉकला लागून, सिनाळा गावाजवळ असल्यामुळे तसेच या खाणीच्या परिसरात किमान १० वाघ आणि असंख्य वन्यजीव आहेत. या विस्तारीकरणावर १२१.५८ हेक्टर जंगल कापल्या जाणार असून त्यात १३ हजार ४५७ वृक्ष आणि ६४ हजार ३४९ बांबू कोळशासाठी तोडल्या जाणार आहेत, असे पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. खाणीसाठी लागणाऱ्या बहुतेक मंजुरी वनविभागाने, राज्य आणि केंद्र शासनाने दिल्या आहेत. शासनाचे ‘ग्रीन’ ऊर्जेचे धोरण असताना तसेच गरज नसताना कोळशासाठी जंगल, वाघ, वन्यजीव आणि ताडोबाचे जंगल देणे योग्य नाही अशी पुष्टी प्रा. चोपणे यांनी जोडली.
वन्यप्रेमी न्यायालयात जाणार
खाणीच्या विस्तारीकरणाला चंद्रपूर येथील वन्यजीव संस्था आणि वन्यप्रेमींनी ‘ताडोबा बचाव समिती’ची स्थापना केली असून या विस्तारीकरणाला विरोध करायचे ठरविले आहे. या खाणीमुळे ताडोबाचे जंगल आणि वाघाचा भ्रमणमार्ग धोक्यात येत असल्यामुळे या खाणीला जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने सोमवारी प्रत्यक्ष कोळसा खाणीच्या परिसरात जाऊन विरोध दर्शविणार आहे. याशिवाय न्यायालयीन मार्गाने सुद्धा ही खाण रद्द होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राच्या सीमेजवळ अगदी दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर ही खाण येऊ घातली असल्यामुळे या कोळसा खाणीचा चंद्रपूर परिसरातील वन्यजीवांवर अत्यंत वाईट परिणाम होणार आहे. चंद्रपूरच्या परिसरातील मानव-वन्यजीव संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याची भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे.