केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभागाने (डीपीआयआयटी) नुकतीच परकीय गुंतवणुकीची आकडेवारी प्रसिद्ध केली असून, यामध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षात महाराष्ट्राने बाजी मारली आहे. राज्यात गेल्या अर्थिक वर्षामध्ये एक लाख १८ हजार ४२२ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सेवा, ऑटोमोबाइल, कम्प्युटर सॉफ्टवेअर, हार्डवेअर, दूरसंचार, बांधकाम, औषधनिर्मिती, रसायने या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली असल्याचे दिसून आले आहे.
या देशांतून गुंतवणूक
गेल्या वर्षी अमेरिका, जपान, मॉरिशस, नेदरलँड, इंग्लंड, जर्मनी, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर या देशांनी सर्वाधिक गुंतवणूक देशात आणि महाराष्ट्रात केली असल्याचे ‘डीपीआयआयटी’ने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
कर्नाटक, गुजरातची कामगिरी
कर्नाटकामध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षात देशातील सर्वाधिक म्हणजेच सुमारे एक लाख ६३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. त्या पूर्वीच्या वर्षात परकीय गुंतवणुकीमध्ये अव्वल येण्याचा मान गुजरातने पटकावला होता. २०२०-२१ या वर्षात एक लाख ६२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातने मिळवली होती. यंदा महाराष्ट्राने ही कामगिरी करून दाखवली आहे.
परकीय गुंतवणुकीचे चित्र
२०२०-२१ २०२१-२२ २०२२-२३
महाराष्ट्र १,१९,७३४ १,१४,९६४ १,१८,४२२
गुजरात १,६२,८३० २०,१६९ ३७,०५९
कर्नाटक ५६,८८४ १,६३,७९५ ८३,६२८
दिल्ली ४०,४६४ ६०,८३९ ६०,११९
तमिळनाडू १७,२१४ २२,३९६ १७,२४७
हरियाणा १२,५५९ २०,९७१ २०,७३५
(आकडे कोटींमध्ये)
सेवा, कम्प्युटर क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक
गेल्या वर्षभरात देशात झालेल्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक सेवा व कम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात करण्यात आली आहे. सेवा क्षेत्रात सुमारे १५ टक्के गुंतवणूक झाली असून, १६ टक्के गुंतवणूक कम्प्युटर, सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात झाली आहे. त्यापाठोपाठ ट्रेडिंग (६ टक्के), दूरसंचार (६ टक्के), ऑटोमोबाइल (६ टक्के) अशी गुंतवणुकीची क्षेत्र आहेत.
परकीय उद्योगांना गुंतवणूक करण्यासाठी जे वातावरण लागते, ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्राने केला आहे. गुंतवणुकीचा प्रस्ताव आल्यानंतर तो मंत्रीमंडळ बैठकीमध्ये तातडीने मंजूर करण्याचे धोरण ठेवले असून, उद्योगांना अनेक सवलती दिल्या. गुंतवणुकीत ‘इझ ऑफ डुइंग’ यावे म्हणून अनेक बदल घडवले. त्यामुळे महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आला आहे.
– हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव, उद्योग विभाग
पुणे जिल्ह्यात मोठी गुंतवणूक
गेल्या वर्षभरात राज्यात झालेल्या परकीय गुंतवणुकीमध्ये पुणे जिल्ह्यात मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. हिंजवडी आयटी पार्कसह चाकण, भोसरी आणि रांजणगाव एमआयडीसीमध्ये परकीय गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांनी आपल्या कंपन्यांची सुरुवात केली असून पुण्यापाठोपाठ मुंबई, औरंगाबाद, नागपूर या शहरांमध्येही परकीय गुंतवणूक होत असल्याचे राज्य सरकारच्या उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.