अजित पवार नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादीचा २४ वा वर्धापन दिन पूर्ण होऊन आपण २५ व्या वर्धापन दिनामध्ये प्रवेश करत आहे. याचा विचार तुम्ही सगळ्यांनी करायचा आहे. पुणे जिल्ह्याच्या भोर, वेल्हा, मुळशी येथील सगळे पदाधिकारी आले आहेत. मुळशीच्या लोकांनी पण काम करायचे आहे. मुळशीच्या लोकांना पदं दिलेली आहेत, म्हणून भांडायचं नाही. नाहीतर एक एकांचा कानाखाली आवाज काढीन. याच्यातून तुमची नाही आमची बदनामी होते. पवार साहेबांची बदनामी होते. हा कुठला फाजीलपणा चालला आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश
आगामी काळात विदर्भात राष्ट्रवादीची ताकद वाढली पाहिजे. महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी व्यापक समाजहिताचे राजकारण केले. तेच राष्ट्रवादीला अभिप्रेत आहे. भविष्यात सत्ताकारणात नवे चेहरे देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा लोकांच्या संपर्कात राहावे. तसेच जातनिहाय जनगणना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सतत लावून धरली पाहिजे, असे आदेशही अजित पवार यांनी दिले.