फरुर्खाबाद: उत्तर प्रदेशच्या फरुर्खाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन वर्षांच्या एका मुलानं सापाचा चावा घेतला. चिमुरड्यानं सापाला चावून चावून मारलं. मोहम्मदाबादमधील मदनापूरमध्ये ही घटना घडली. चिमुरड्यानं सापाला मारुन टाकल्याचं लक्षात येताच त्याचे पालक घाबरले. त्यांनी मेलेल्या सापाला पॉलिथिनच्या पिशवीत टाकलं. त्यानंतर मुलाला घेऊन त्यांनी रुग्णालय गाठलं. डॉक्टरांनी मुलाला २४ तास निगराणीखाली ठेवलं. चिमुकल्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही.दिनेश कुमार यांचा मुलगा आयुष घराच्या अंगणात खेळत होता. तितक्यात तो आरडाओरडा करु लागला. त्याचा आवाज ऐकून आजीनं धाव घेतली. आयुषच्या तोंडात मेलेला साप पाहून आजीला धक्काच बसला. तिनं आयुषच्या तोंडातून साप बाहेर काढला आणि त्याचं तोंड धुवून साफ केलं. याची माहिती आयुषच्या पालकांना मिळताच त्यांनी मुलाला घेऊन डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात धाव घेतली. आयुषनं नेमका कोणत्या सापाचा चावा घेतलाय, ते डॉक्टरांना सांगण्यासाठी त्यांनी मृत सापालादेखील पिशवीत टाकून रुग्णालयात नेलं. जिल्हा रुग्णालयात आपत्कालीन ड्युटीवर असलेल्या डॉ. मोहम्मद सलीम अंसारी यांनी आयुषवर प्रथमोपचार केले. मुलाला आवश्यक औषध देण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याचा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती अंसारी यांनी दिली. साप विषारी नव्हता. त्यामुळे आयुषच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं.
Home Maharashtra अंगणात खेळताना सापाला चावला चिमुरडा; आरडाओरडा ऐकून आजी बाहेर; पुढे आश्चर्यजनक प्रकार...