मुंबई: देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या एकनाथ खडसे यांना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी घरवापसीची ऑफर दिली आहे. विनोद तावडे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विनोद तावडे यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखीतमध्ये यासंदर्भात भाष्य केले. यावेळी विनोद तावडे यांनी म्हटले की, मला असं वाटतं की, नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लीडरशीपची गरज आहेच. खडसे यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण असून त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असावा. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ लोकांनी येणं.. पण नुसतं येताना नाथाभाऊ ज्या स्पष्टपणे बोलतात तसं अपेक्षित नसेल. पण जी-जी माणसं पक्षात आली पाहिजे असं आम्हाला वाटतं त्यात नाथाभाऊ आहेत, असे विनोद तावडे यांनी म्हटले.

Pankaja Munde: पराभव होऊनही अनेकांना मंत्रिपदं मिळाली, पंकजा मुंडेंची खंत; आता थेट अमित शाहांना भेटणार

विनोद तावडे यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत स्तरावर वेगळ्याच हालचाली सुरु आहेत का, अशी शंका अनेकांच्या मनात उत्पन्न झाली आहे. खडसे यांची भाजपमध्ये येण्याची इच्छा असेल, तर फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा करून उचित निर्णय घेतील. पण खडसे यांना भाजपच्या शिस्तीचे पालन करावेच लागेल, असेही विनोद तावडे यांनी म्हटले. परंतु, माझे एकनाथ खडसे किंवा पक्षश्रेष्ठींशी माझे बोलणे झालेले नाही किंवा त्यांना प्रस्ताव दिलेला नाही, अशी पुस्तीही विनोद तावडे यांनी जोडली.

फडणवीस केंद्रात, विनोद तावडे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार का? तावडेंनी चार शब्दांत विषयच संपवला

राज्यात भाजपची सत्ता येईपर्यंत म्हणजे २०१४ पर्यंत एकनाथ खडसे हे महाराष्ट्र भाजपचा प्रमुख चेहरा होते. विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर एकनाथ खडसे यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुलनेत नवख्या असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा दिली. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात वाद सुरु झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे एकनाथ खडसे यांना मंत्रिपद सोडावे लागले होते आणि त्यानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये बाजूला सारले गेले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकदा तिखट शब्दांत टीका केली आहे, गंभीर आरोप केले आहेत. मात्र, तरीही विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर; पंकजा मुंडेंच्या भाजपवरील नाराजीवर चर्चा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here