भुवनेश्वर: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात तीन ट्रेन्सचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये २८८ जणांचा मृत्यू झाला असून हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. कोणी नोकरी शोधण्यासाठी, कोणी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी, कोणी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी घरातून निघालं होतं. मात्र अनेकांसाठी हा प्रवास अखेरचा ठरला. कित्येकांच्या आयुष्याचा प्रवास या अपघातामुळे संपला. बिनोद दास यांचं संपूर्ण कुटुंब या अपघातात संपलं. दोन दिवस उलटले, तरीही दास या धक्क्यातून सावरलेले नाहीत. डोळ्यांमधल्या अश्रूधारा अद्यापही थांबलेल्या नाहीत.४८ वर्षांचे बिनोद बालासोरमध्येच राहतात. त्यांची पत्नी झरना दास (४२ वर्षे), मुलगी विष्णुप्रिया दास (२४ वर्षे) आणि मुलगा संदीप दास (२१ वर्षे) यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. बिनोद दास यांचं कुटुंब डॉक्टरांकडे चेकअपसाठी कटकला निघालं होतं. मात्र रेल्वे अपघातात त्यांचं कुटुंब संपलं. अपघातानंतर बिनोद यांना रेल्वेकडून ५० हजार रुपये रोख मिळाले. तर ९ लाख ५० हजार रुपयांचा चेक मिळाला आहे.
‘माझ्या पत्नी, मुलाचा, मुलीचा अपघातात मृत्यू झाला आहे. ते बालासोरहून कटकला डॉक्टरांकडे चेकअपला जात होते. मी बालासोर, सोरो, भद्रक आणि गोपालपूरमध्ये त्यांच्या मृतदेहांची शोधाशोध केली. काल दुपारी १२ च्या सुमारास मला पत्नीचा मृतदेह बहानगा शाळेत सापडला. पण मी आता या पैशांचं काय करु? माझं कुटुंबच आता या जगात नाही. मी संपूर्ण जगाला आता तोंड दाखवू शकत नाही,’ अशा शब्द बिनोद यांनी त्यांची आपबिती मांडली.

ओडिशा रेल्वे अपघाताबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे हा अपघात झाला असून त्याचा तपास सुरू आहे. अपघातासाठी जबाबदार असलेल्यांची ओळख पटलेली आहे. मात्र तपास पूर्ण होईपर्यंत वाट पाहायला हवी, असं वैष्णव म्हणाले.