५ जून रोजी झारखंडच्या देवघरमध्ये एका तरुणाचे लग्न होणार होते. मात्र, लग्नाच्या एक दिवस आधी घरातील एका खोलीत तो तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. २६ वर्षीय खेलू दास असे मृत तरुणाचे नाव आहे. आज ज्या दारातून त्याची वरात काढली जाणार होती, तिथेच आज त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी केली जात आहे.
झारखंड येथील देवघर जिल्ह्यातील येथील सलैया गावातील रवि दास यांचा मुलगा २६ वर्षीय खेलू दास याचा विवाह बिहारमधील बांका जिल्ह्यातील कालोधर येथे निश्चित झाला होता. सोमवारी गावातून वरात निघणार होती. हे लग्न खेलूच्या संमतीनेच होत होतं, त्याने स्वत:ला मुलगी पसंत केली होती. घरातही लग्नापूर्वीच्या विधी सुरू झाल्या. शनिवारी हळदीचा कार्यक्रम पार पडला. नातेवाईक आणि कुटुंबीयांनी रात्रभर डीजेवर डान्स केला. त्यानंतर रविवारी पहाटे पाच-सहा वाजता नवरदेवासह सारेच झोपायला गेले.
रविवारीच गावातील लोकांसाठी मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. परंपरेनुसार पथरोल काली मंदिरात बोकडाचा बळीही देण्यात आला. त्यानंतर जेव्हा कुटुंबीय खेलूला झोपेतून उठवण्यासाठी तेव्हा त्याच्या खोलीचा दरवाजा बंद असल्याचे दिसले. त्याला आवाज देण्यात आला, दार ठोठावण्यात आलं. पण, त्याने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. खूप प्रयत्न करूनही दरवाजा न उघडल्याने कुटुंबीयांनी खिडकी तोडली. आत खेलू गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला.
खेलूने खोलीचा दरवाजा बंद करून पंख्याला गळफास लावून घेतला होते. कुटुंबीयांनी तात्काळ त्याला खाली उतरवलं आणि मधुपूर उपविभागीय रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
मृत स्वतः त्याच्या लग्नाच्या तयारीत मग्न
मृत खेलू हा गुजरातमध्ये कामाला होता. अचानक त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबातील सर्व सदस्य हैराण झाले आहेत. त्याने असे पाऊल का उचलले हे कोणालाच समजू शकले नाही. खेलू स्वतः लग्नाच्या तयारीत गुंतला होता. कार आणि डीजे बुकिंगबद्दल त्याने स्वत: केले होते. रात्रभर डीजेवर नाचल्यानंतर रविवारी सकाळी नातेवाईकांसोबत चहा घेतल्यानंतर तो म्हणाला – ‘मी खूप थकलो आहे, मी झोपणार आहे.’ पण, तो झोपायला गेला तो नेहमीसाठीच.
घटनेची माहिती मिळताच मधुपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा प्रेमप्रकरण आणि घरगुती वादाच्या अँगलने तपास करत आहेत. कुटुंबीयांकडूनही माहिती घेतली जात आहे. मात्र, मृत्यूच्या कारणाबाबत नातेवाईक अद्याप माहिती देऊ शकलेले नाहीत.