ट्रेनच्या डब्याच्या खालील भागात असलेली भेग रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाहिली आणि एकच खळबळ माजली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी याची माहिती त्यांच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वेगानं चक्रं फिरली. अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना याबद्दल कळवलं. त्यानंतर ट्रेन तिथेच थांबवण्यात आली.
कोल्लम-चेन्नई एगमोर एक्स्प्रेसला सेंगोट्टोई रेल्वे स्थानकावरच थांबवण्यात आलं. भेग पडलेल्या डब्यातील प्रवाशांची समजूत काढून त्यांना पुढेमागे असलेल्या डब्यांमध्ये शिफ्ट करण्यात आलं. जवळपास एक तासाचा अवधी यात गेला. त्यानंतर कोल्लम-चेन्नई एगमोर एक्स्प्रेस पुढे रवाना करण्यात आली. याची माहिती मदुराई रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांना देण्यात आली.
कोल्लम-चेन्नई एगमोर एक्स्प्रेस मदुराईला पोहोचल्यावर एस-३ डबा वेगळा करण्यात आला. त्याच्या जागी नवा डबा जोडून त्यामध्ये प्रवाशांना बसवण्यात आलं. डब्याला पडलेली भेग बरीच मोठी होती आणि ती चाकाच्या अगदी वर होती. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकली असती. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सजगपणामुळे एस-३ डबा तातडीनं रिकामा करण्यात आला. पुढच्याच स्थानकात त्या डब्याच्या जागी नवा जोडण्यात आला. त्यामुळे मोठा अपघात टळला.