या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, आनेवाडी फाट्यापासून जवळच असणाऱ्या थोरल्या पुलावर अनधिकृत थांबा आहे. त्या ठिकाणी सुनाबाई बबन कांबळे, त्यांची मुलगी आरती राजेंद्र कांबळे, लहान मुलगी श्रावणी राजेंद्र कांबळे या तिघी आपल्या नातेवाईकाकडे जाण्यासाठी शिरवळ येथून आल्या होत्या.
टोलनाक्याऐवजी पुढे येऊन आनेवाडी पुलानजीक त्या उतरल्या होत्या. पाठीमागून भरधाव वेगात एक टँकर ( GJ 20 – V – 7473 ) बेळगावकडे निघाला होता. यावेळी टँकर चालकाचा ताबा सुटल्याने महामार्गालगत नुकत्याच बसमधून उतरून उभ्या असणाऱ्या महिलांना त्याने चिरडले.
अपघात इतका भयानक होता, की या ठिकाणी रस्त्यावर अक्षरशः मांस पडले होते. आरती राजेंद्र कांबळे या जागेवरच या अपघातात मृत्युमुखी पडल्या, तर त्यांची आई सुनाबाई कांबळे यांचे सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे मृत झाल्या, तर श्रावणी कांबळे ही गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी सातारा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक घनवट व इतर महामार्ग पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिकेतून जखमींना सातारा येथे उपचारासाठी पाठवून दिले. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार अवघडे, पोलीस हवालदार जाधव व पोलीस नाईक धुमाळ करीत आहेत.
आनेवाडी टोलनाक्याजवळ कायमच अपघात घडत असतात. मात्र, कोणत्याही प्रकारे संबंधित विभाग उपाययोजना करत नसल्याने त्यांचा त्रास निष्पाप प्रवाशी वर्गाला होत आहे.